औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमीवर देशद्रोहाखाली तात्काळ अटकेची कारवाई करावी!

04 Mar 2025 15:42:05
 
Pravin Darekar
 
 
मुंबई: ( pravin darekar on abu azmi ) समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असे विधान केले. त्यांच्या या विधानाचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी संताप व्यक्त करत औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमीवर राजद्रोह, देशद्रोह व राज्य अस्थिर करण्याच्या गुन्ह्याखाली तत्काळ अटक करावी, अशी मागणी सभागृहात केली आहे.
 
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाल्याबरोबर आ.दरेकर यांनी विधानसभा सदस्य अबू आझमी यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे बलिदान हा देश कधीही विसरू शकणार नाही. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले. ज्यांनी काल औरंग्याची आरती ओवाळली त्यांच्याच पिलावळीने मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या स्मृतीदिनी सोशल मीडियावर औरंगजेब, टिपू सुलतानला हिरो ठरविणारे आणि महाराजांचा अपमान करणारे स्टेटस ठेवले होते.
 
त्यानंतर संभाजीनगर, अकोला, शेवगाव, संगमनेर, कोल्हापूर आणि राज्यातील इतर भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यावेळी विरोधी पक्षाने कायदा सुव्यवस्थेसंदर्भात ओरड केली होती. राज्यातील कायदा सुव्यवस्था कोण बिघडवतेय ? औरंग्याची बढाई करणारा हा धर्मांध चुकीचा इतिहास दाखविल्याचा दावा करतो. अबू आझमी औरंग्याला क्रूर मानत नाही. संभाजी महाराजांच्या बाबतीत औरंगजेबाने जे केले तो क्रूरतेचा कळस होता. म्हणजे यापेक्षाही क्रूरता दाखवायला हवी होती, अशी तर अबू आझमींची भावना नव्हती ना, असा संशयही दरेकर यांनी व्यक्त केला.
 
ज्या औरंग्याने आमच्या संभाजी महाराजांचा कटकारस्थानाने जीव घेतला त्यांचे उदात्तीकरण करणारे हेही औरंग्याच्याच विचाराचे आहेत. अबू आझमींनी केवळ औरंगजेबाचे उदात्तीकरण केले नाही तर महाराष्ट्रातील विशिष्ट धर्माच्या लोकांना चिथावणीही दिलीय. त्यांनी देशद्रोह, राजद्रोह केलाय, तरुणांची डोकी भडकावून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या अशा सदस्याला आजच्या आज देशद्रोहाखाली अटक करावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

 
 
Powered By Sangraha 9.0