( life journey of Sandhya Damle ) शास्त्रीय नृत्यकलेची उपासना करताना सामाजिक भान जपत, आपल्या कार्यातून कुशल नृत्यांगना घडवणार्या संध्या दामले यांचा हा जीवनप्रवास
रंगमंचावर सादर होणारे नृत्य म्हणजे प्रतिभेचा अविष्कार असतो. या अविष्कारमध्ये नवरसांची गुंफण केली जाते आणि संपूर्ण वातावरणच चैतन्यमय होऊन जाते. काही क्षणांसाठी समोर सुरू असलेला नृत्याविष्कार प्रेक्षकांना सुखावणारा असतो.परंतु, हे नृत्य साकारणारा कलाकार याच काही क्षणांसाठी आपले आयुष्य वेचत असतो. रंगमंचावरील काही मिनिटांचा नृत्याविष्कार सादर करण्यासाठी, वर्षानुवर्षे साधना केली जाते. शास्त्रीय नृत्याची तपस्या करणार्या अशाच एक विदुषी म्हणजे, संध्या दामले.
संध्या आणि नृत्य हे समीकरण लहानपणीच रूढ झाले होते, असे त्या सांगतात. शाळेमध्ये पाटीवर बाराखडी गिरवण्याच्या आधीच, नृत्याचे ताल आणि सूर त्या हळूहळू शिकत होत्या. वय वाढत गेले, तशा त्या शास्त्रीय नृत्याकडे वळल्या. ‘भरतनाट्यम’ हा नृत्याविष्कार शिकायचा त्यांनी निर्णय घेतला. अंधेरीच्या परांजपे विद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी नृत्याचे, गायनाचे क्लासेस आजच्या इतके उपलब्ध नव्हते. अशातच संध्या यांनी आपल्या मैत्रिणीकडून धडे गिरवायला सुरुवात केली. नृत्यासोबतच संध्या या मैदानी खेळांमध्येसुद्धा तरबेज होत्या. “आज जर मी नृत्यांगना नसते, तर खेळाडू असते,” असे संध्या म्हणतात. नृत्याच्या विश्वात रममाण होता होता, त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. नालंदा नृत्य कला महाविद्यालयात प्रवेश घेत, त्यांनी आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले. परंतु, आपले ईप्सित ध्येय सहजासहजी साध्य होत नाही. स्वप्नपूर्तीची पायवाट अनेक खाचखळग्यांनीच भरलेली असते. संध्यासुद्धा याला अपवाद नव्हत्या. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर, भाषेच्या संदर्भातील प्रश्न संध्या यांना भेडसावू लागला. इंग्रजी माध्यमातून शिक्षण न झाल्यामुळे, अभ्यासातील गोष्टी कठीण वाटू लागल्या. त्यांच्यासोबत शिकणार्या त्यांच्या समवयस्क उत्तम इंग्रजी बोलायच्या. सुरुवातीचे सहा महिने त्यांच्यासाठी खूपच कठीण गेले. मात्र, जिद्द आणि चिकाटी यांचा संगम असल्यास, कोणतीही गोष्ट अशक्य नाही याची त्यांना प्रचिती आली. संध्या यांनी नव्या हुरुपाने कामाला सुरुवात केली. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या आणि अखेर त्यांना, त्यांचा सूर गवसला. शास्त्रीय नृत्याचा अभ्यास करताना त्यातील बारकावे, त्याचे वेगळेपण त्या शिकत गेल्या. आकलनाच्या कक्षा रुंदावल्यामुळे, आपसूकच त्याचे रूपांतर शैक्षणिक यशामध्ये झाले.
महाविद्यालयात शिकता शिकता, इतरांना नृत्य शिकवण्याची संधीसुद्धा त्यांच्याकडे चालून आली. गोरेगाव इथल्या प्रबोधन क्रीडाभवन येथे शिक्षिका म्हणून, त्या रुजू झाल्या आणि पुढची 28 वर्षे त्यांचा हा प्रवास अव्याहतपणे सुरू राहिला. दरम्यानच्या काळात, त्यांचे स्वत:चे शिकणे कुठेही थांबले नाही. लग्न, मुलं, या सगळ्या सांसारिक जबाबदार्या पार पाडून, त्यांनी आपली साधना सुरू ठेवली. संध्या म्हणतात की, त्यांच्या गुरू ‘पद्मविभूषण’ डॉ. कनक रेळे यांनी त्यांना कायम साथ दिली. कनक रेळे यांनी, स्वत: ‘मोहिनीअट्टम’ या नृत्यप्रकारात ‘पीएच.डी’ केली आहे. त्यांच्याच नालंदा नृत्यकला महाविद्यालयात, संध्या यांनी ‘भरतनाट्यम’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संध्या यांना, स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची होती. म्हणूनच 1998 साली त्यांनी, ‘नृत्यदर्पण अॅकेडमी ऑफ फाईन आर्ट्स’ची स्थापना केली. संध्या यांना त्यांच्या स्वत:चा ब्रॅण्ड विकसित करायचा होता. संध्या यांच्या मनात एकच ध्येय होते आणि ते म्हणजे, पुढच्या पिढीला शास्त्रीय नृत्यात पारंगत करायचे. आपल्या भारतीय कलेची, संस्कृतीची ओळख पुढच्या पिढीला झाली पाहिजे, हा ध्यास त्यांनी मनी बाळगला. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी, ‘नृत्यदर्पण’मध्ये शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात गीतरामायण आणि गीतगोविंद यांच्यावरील कार्यक्रम,‘नृत्यदर्पण’च्या माध्यमातून पार पडला. विविध नृत्यमहोत्सवांमध्ये, संध्या यांच्या विद्यार्थांनी आपली कला सादर केली. ‘काला घोडा कला महोत्सव’, ‘खजुराहो आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव’ अशा नामवंत नृत्यमहोत्सवात, ‘नृत्यदर्पण’च्या विद्यार्थ्यांचा डंका वाजला आहे.
‘संध्या दामलेंचे नृत्यदर्पण म्हणजे, उत्तम नृत्य शिक्षणाची हमी देणारी नृत्यशाळा’ असा पालकांचा ठाम विश्वास आहे. मागची दोन वर्षे नृत्यदर्पणकडून, ‘स्फूर्ती’ या नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्सवाचे उद्दिष्ट एकच, ते म्हणजे नवोदितांना संधी आणि हक्काचे एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. नव्या पिढीसाठी तयार झालेल्या या व्यासपीठाचा वापर त्यांनी पुरेपूर करून घ्यावा, असे आवाहन संध्या करतात. कलेविषयी तरुण पिढीला मार्गदर्शन करताना त्या म्हणतात की, “तरुण पिढीने किमान एक कला आत्मसात करायला हवी. कारण, कला हे मानवाला लाभलेले वरदान आहे. कलाही आपल्याला जगायला शिकवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कला आपल्याला स्वत:शी संवाद साधायला शिकवते. तणाव व्यवस्थापन, एकाग्रता या गोष्टींसाठी आपण वेगवेगळ्या माध्यमांचा शोध घेत असतो. मात्र, आपण जेव्हा एखादी कला आत्मसात करतो, त्यावेळी आपसूकच आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. कलाही आपल्याला स्वर्गीय आनंद देणारी गोष्ट आहे.” कलाकार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करताना, पुढच्या पिढीसाठी झटणार्या संध्या दामले म्हणजे, अनेक नृत्यांगनांसाठी दीपस्तंभ आहेत. नृत्यांगना संध्या यांना यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!