वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला ! राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
04-Mar-2025
Total Views |
मुंबई:( Dhananjay Mundes reaction after resignation ) माझी प्रकृती ठीक नसल्याने वैद्यकीय कारणास्तव मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी मंगळवार, ४ मार्च रोजी दिली.बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
त्यानंतर धनंजय मुंडे आपल्या 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत म्हणाले की, "माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे," असे त्यांनी सांगितले.
हत्येचे फोटो पाहून मन व्यथित
"बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे."