- अनिल गलगली यांची मागणी; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियमाला बगल
04-Mar-2025
Total Views |
मुंबई: ( Kurla Citizens Cooperative Bank elections ) दि. कुर्ला नागरिक सहकारी बँकेची निवडणूक दि. १६ मार्च रोजी नियोजित आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने शासकीय नियमाला बगल देत शाखा निहाय निवडणूक घेण्यास नकार दिला आहे. हे गंभीर असून, ही निवडणूक तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सहकारी निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ च्या नियम ३ (ह) नुसार, मतदान केंद्रे अधिक संख्येने व सोयीच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी नितीन दहीभाते यांनी केवळ एका ठिकाणी मतदान ठेवण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. शाखानिहाय मतदान केंद्रे ठेवल्यास अधिकाधिक सभासदांना मतदानाची संधी मिळेल आणि पारदर्शक निवडणूक पार पडेल.
बँकेने मागील २० वर्षांत मतदार यादी अद्यावत केलेली नाही. हजारो मृत मतदारांची नावे अद्याप मतदार यादीत आहेत, ज्यामुळे बोगस मतदानाचा मोठा धोका आहे, असे गलगली यांनी पत्रात नमूद केले आहे. योग्य मतदार यादी तयार न करता निवडणूक घेणे म्हणजे लोकशाहीची थट्टा करण्यासारखे आहे. रविवार, दि. १६ मार्च रोजी रेल्वे मेगाब्लॉक असल्याने ठाणे, वाशी, मुलुंड आणि भांडुप येथील मतदारांना मतदानासाठी येणे कठीण होईल. तसेच, निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली सत्य परिस्थितीचा विचार न करता शाखानिहाय मतदान केंद्रे निश्चित केली नाहीत. त्यामुळे ही निवडणूक तात्काळ स्थगित करून मतदार यादी संपूर्णपणे अद्यावत करावी, मृत व्यक्तींची नावे वगळावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे. अन्यथा, या निवडणुकीस सहकारी संस्था नियमांचे उल्लंघन करणारी आणि गैरव्यवहारास मदत करणारी निवडणूक मानले जाईल, असा इशाराही अनिल गलगली यांनी दिला आहे.