रिझर्व्ह बँकेला अंधारात ठेवत फेमा कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप
04-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : भारतातील फिनटेक क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या पेटीएमवर ईडीकडून सिंगापूर येथे बेकायदेशीर रित्या गुंतवणुक केल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी कडून करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेला अंधारात ठेवत ही गुंतवणुक झाल्याचा आरोप करत हे फेमा कायद्याचे उल्लंघन असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन या कंपनीकडून ही गुंतवणुक झाली आहे. हे सर्व आरोप ईडीने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या आपल्या अहवालात केले आहेत.
ईडीने दिलेल्या वृत्तानुसार पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन या कंपनीने सिंगापूर येथे केलेल्या गुंतवणुकीसाठी भारतातील बँकिंग क्षेत्राची नियामक संस्था असलेल्या रिझर्व्ह बँकेकडे कुठलीही आवश्यक अशी कागदपत्रे जमा केली नव्हती. तसेच याच अहवालात असेही नमुद करण्यात आले आहे की या कंपनीने रिझर्व्ह बँकेने दिलेल्या कुठल्याही मार्गदर्शक तत्वांचे पालन न करताच परकीय गुंतवणुकसुध्दा मिळवली होती. हे दोन मुख्य आरोप कंपनीवर ठेवण्यात आले आहेत. ईडीच्या वृत्तानुसार हा सर्व व्यवहार २०१५ २०१९ या कालावधीतील आहेत.
या बाबत ईडीने वन ९७ कम्युनिकेशनला परकीय चलन हाताळणी कायदा म्हणजेच फेमाच्या अंतर्गत ६११ कोटींच्या परकीय चलन हाताळणीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्या अंतर्गत कंपनीला केलेल्या सर्व व्यवहारांचे तपशील जाहीर करायचे आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना पेटीएम कंपनीने कुठल्याही बेकायदेशीर प्रकार घडल्याचे नाकारत या प्रकरणात कायदेशीर सल्ला मागितला आहे.