संस्कृत, संस्कृतीचे संवर्धन

    04-Mar-2025
Total Views |

Nashik City of Sanskrit and culture

धार्मिक शहर म्हणून असलेल्या नाशिकची ओळख मधल्या काळात, ‘वाईन कॅपिटल’ म्हणून करण्याचा प्रयत्न काही राजकारण्यांनी करून पाहिला. परंतु, दिवसागणिक त्यातील फोलपणा उघडा पडून, शेतकरी वर्गाला आर्थिक खाईत लोटण्याचाच हा प्रकार असल्याचे पुढे आले. त्यामुळे शेतकरी वर्गाने, वाईन उद्योगाकडे पाठ फिरवली ती कायमचीच. त्यामुळे नाशकातला वाईन उद्योग बाळसे धरण्याआधीच मातील रुतला, तो परत कधीच वर आला नाही. आता नावाला चार-दोन कंपन्या आपले अस्तित्व धरून आहेत. यातून आपल्या पुरातन संस्कृतीची जपणूक करून, त्यातूनच आपला विकास साधणे कसे गरजेचे आहे, हे पुढे येत गेले.
 
त्यामुळेच ‘जुनं ते सोनं’ या न्यायाने २०१४ सालानंतर पुन्हा नाशिकने कात टाकत, आपली पारंपरिक असलेली ‘धार्मिक शहर’ही ओळख पुन्हा मिळवायला सुरुवात केली. त्याचा चांगला परिणाम नजरेस पडत आहे. मागील दहा वर्षात शहरात असलेल्या पुरातन पाऊलखुणा, नव्याने जगासमोर आणण्यास जाणीवपूर्वक सुरुवात करण्याचा घाट घातला गेला. त्यामुळेच नाशिकची खरी ओळख जगासमोर येण्यास सुरुवात झाली. या प्रमुख ओळखींपैकी एक असलेल्या, प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षण पुन्हा एकदा ‘राम कालपथ’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे साकारले जात आहेत. त्यापाठोपाठ शहरातील साधु-महंतांनी नाशिकमध्ये वेद, उपनिषद आणि पुराणात उपलब्ध असलेले शिक्षण सर्व घटकांना मिळावे, या उद्देशाने सिद्ध पिंप्री येथे, वेद महाविद्यालय सुरू केले.
 
आता त्यापुढे पाऊल टाकत, नाशिकमध्ये संस्कृत विश्वविद्यालयाचीही पायाभरणी केली जाणार आहे. त्यासाठी केंद्राने हिरवा कंदील दाखवला असून, येत्या पाच वर्षांत हे विश्वविद्यालय सुरू होऊन, तक्षशिला आणि नालंदाची कसर निश्चित भरून काढली जाईल. यामध्ये भव्य वास्तू उभारून, शिक्षणाची दारे सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी खुली करून देण्यात येणार आहेत. या निर्णयाने आपली मूळ संस्कृती विसरत चाललेल्या पिढीलाही योग्य मार्गावर आणून, त्यांना संस्कृत भाषा आणि पुरातन ठेवा यांचा सुरेख मिलाप करत शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे. यातून सुसंस्कृत समाज घडेलच; पण काळाच्या ओघात पडद्याआड होत असलेल्या आपल्या संस्कृत भाषेचेही संवर्धन होण्यास मदत होणार आहे.
 
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन
 
हरितक्रांतीच्या प्रयोगानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळला. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत शेतकरी आर्थिक संपन्न होत गेला. त्यामुळे इथे, शेतीची पाळेमुळे अगदी खोलवर रुजल्याचे दिसून येते. त्यातल्या त्यात दिंडोरी आणि निफाड तालुक्यात तर, द्राक्ष पिक शेतकरी वर्गासाठी मोठे वरदान ठरले. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन या भागातला युवा वर्ग, शेतीत राबताना अगदी सहजपणे नजरेला पडतो. असे चांगले वातावरण या भागात असले, तरी इथे वाचन संस्कृती मात्र फारशी काही रुजलेली नाही.
 
त्यामुळे आर्थिक संपन्न असलेल्या या भागाची, वाचनात मात्र काहीशी पिछेहाट झालेली दिसून येते. पण, राज्यशासनाने काल परवा एक निर्णय घेतल्याने, इथलीही कमीदेखील भरून निघण्यास वाव निर्माण झाला आहे. त्याचे असे झाले की, तात्यासाहेब अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचे मूळ गाव शिरवाडे-वणी गावाला, कवितांचे गाव निर्माण करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. त्याअनुषंगाने कवितेच्या पहिल्या दालनाचे जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत, मराठी भाषामंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटनही पार पडले.
 
यासोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून, प्रत्येक वर्षी कुसुमाग्रज महोत्सवाचे आयोजनही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, येत्या वर्षभरात कवितांची आणखी काही दालने सुरू होणार असून, संपूर्ण गाव कवितांचे गाव म्हणून नावारूपाला येईल. त्यामुळे वाचन संस्कृतीला निश्चितच प्रोत्साहन मिळेल. त्यासोबतच नवनवीन कवी, लेखक आणि विचारवंतही या मातीत घडण्याची ही नांदीच ठरेल. शिरवाडे-वणी या गावानंतर आता द्राक्षे, टोमॅटो आणि कांद्याच्या बाजारपेठेसाठी जगभर नावाजलेल्या पिंपळगाव बसवंत या गावालाही, कवितांचे गाव करण्याची मागणी करण्यात आली. वाचन संस्कृतीचे हे लोण दोन पाच वर्षांत नाशिकच्या संपूर्ण ग्रामीण भागात पोहोचून, सर्वच गावांमध्ये वाचन संस्कृती रुजायला मोठा हातभार लावणार आहे. येत्या काळात इथल्या सुपिक मातीमध्ये विचारांचे आणि त्यामागोमाग वाचनाचे पीक भरघोस येऊन, वार्‍यावर निश्चितच डोलणार असल्याचे सध्या तरी चित्र निर्माण झाले आहे.
- विराम गांगुर्डे