नवी दिल्ली: ( Fake caste certificate racket ) तामिळनाडू राज्यात बनावट जात प्रमाणपत्रे देण्यामागे एक मोठे रॅकेट आहे असे प्रथमदर्शनी निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवार दि. 3 मार्च रोजी नोंदवले. तामिळनाडूमधील हजारो लोकांना हिंदू कोंडा रेड्डी समुदायाचे प्रमाणपत्र देण्याशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.
“तामिळनाडू राज्यात जात प्रमाणपत्र ही एक मोठी समस्या असल्याचे दिसून येते,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. “हिंदू कोंडा रेड्डी’ समुदायातील लोकांना अनुसूचित जमाती म्हणून प्रमाणित करणारी हजारो प्रमाणपत्रे जारी करण्यात आली होती. न्यायालय कोणतेही आरोप करत नाही. मात्र, प्रथमदर्शनी हे खूप मोठे रॅकेट असल्याचे दिसते,” असे न्यायालयाने म्हटले.
न्या. जे. बी. पार्डीवाला आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी सुरू होती. ज्यामध्ये अनेक लोकांना ‘हिंदू कोंडा रेड्डी’ समुदायाचे सदस्य असल्याचे जाहीर करणारे प्रमाणपत्र देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यस्तरीय चौकशी समितीला प्रमाणपत्रांच्या सत्यतेची तपासणी करण्याचे आणि त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, जेणेकरून न्यायालय या बाबींवर निर्णय घेऊ शकेल.