अब्दुल रहमानला अटक; गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफ ची संयुक्त कारवाई
04-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : ( Shri Ram temple in Ayodhya ) गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि फरिदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांनी संयुक्त कारवाईत फरिदाबादमधून दहशतवादी संबंधांच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन हँडग्रेनेडही जप्त करण्यात आले, जे सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ निष्क्रिय केले.
तो अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संशयिताचे नाव अब्दुल रहमान (वय १९) असे आहे. तो उत्तर प्रदेशातील फैजाबादचा रहिवासी आहे. हरियाणा पोलीस आणि केंद्रीय एजन्सी अधिक माहितीसाठी अब्दुल रहमानची सखोल चौकशी करत आहेत. रहमानचा मोबाईल आणि इतर जप्त केलेल्या साहित्याचीही चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमान अनेक दिवसांपासून बनावट ओळखपत्रासह फरिदाबादच्या पाली गावात राहात होता. गुजरात ‘एटीएस’ने फरिदाबाद ‘एसटीएफ’च्या मदतीने ही कारवाई केली. तपासयंत्रणा आता अब्दुल रहमानच्या संपर्कांचा शोध घेण्याचा आणि त्याचे हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरोपी ‘आयएसआय’शी संबंधित
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल रहमान हा ‘आयएसआय’च्या ‘आयएसकेपी’ (इस्लामिक स्टेट खोरासान) मॉड्यूलशी संबंधित आहे. अब्दुल रहमान व्यतिरिक्त या मॉड्यूलमध्ये इतर लोकदेखील सामील असू शकतात, ज्यांचा शोध घेतला जात आहे.