रस्त्यांचा भारतीयांच्या चांगल्या आयुष्याशी संबंध, आनंद महिंद्रा नेमकं काय म्हणाले ?

04 Mar 2025 11:32:08
 
anand
 
 
 
मुंबई : भारतातील रस्ते आणि भारतीयांचे जीवनमान यांचा घनिष्ट संबंध आहे. भारतातील अग्रगण्य उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नुकतेच यासंबंधाने एक विधान केले आहे. आपल्याकडील रस्ते सुधारले तर भारतीयांच्या आयुष्यात निश्चितच एक चांगला फरक पडेल. त्यामुळे आपल्याकडील सर्व प्राधिकरणांनी, नगरपालिका, महानगरपालिकांनी याबद्दल विचार केला पाहिजे. आपल्याकडील रस्त्यांची रचना, त्यांचा आकार या सर्वांबद्दल विचार केला पाहिजे असं आनंद महिंद्रा म्हणाले. आपल्या एक्स या समाजमाध्यमावरील अकाऊंटवर याबद्दल पोस्ट करत महिंद्रा यांनी याकडे लक्ष वेधले आहे.
 
आपल्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा म्हणतात की “रस्ते हे फक्त एक पायाभूत सुविधा नाहीत तर ते आपल्या मानसिक आरोग्याचाही भाग आहेत. आपल्या शहरांमधील रस्त्यांची रचना, त्यांचा आकार, त्याची जागा हे ठरवत असतात की आपण आपल्या शहरांत राहणाऱ्या नागरिकांची किती काळजी घेत आहोत. त्यामुळे आपल्या देशातील प्रत्येक प्रशासकीय यंत्रणांनी रस्ते, त्यांची रचना, त्यांचा आकार यांचा शास्त्रशुध्द विचार करुनच ते बांधावेत आणि आपल्या नागरिकांची काळजी घ्यावी.” या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी चांगले रस्ते कसे असावेत याचे काही फोटो पण शेअर केले आहेत.
 
 
 
 
आपल्या महानगरांतील रस्ते आणि त्यांचे प्रश्न हा कायमच एक कळीचा मुद्दा राहीला आहे. कारण मुंबई सारख्या महानगरांत दरवर्षी पावसाळ्यात पडणारे खड्डे, त्यामुळे होणारे अपघात यांमुळे कायमच नागरिकांचा जीव धोक्यात येत असतो. भारतीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार २०२४ या एकाच वर्षात तब्बल १ लाख ८० हजार लोक हे रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील याबद्दल संसदेत चिंता व्यक्त केली होती. आता आनंद महिंद्रांसारख्या मोठ्या उद्योगपतीकडून हा विषय छेडला गेला आहे तर आता नक्कीच यावर चर्चेला तोंड फुटणार यात शंकाच नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0