मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या डाॅल्फिनमधील इंडस रिव्हर डाॅल्फिन या प्रजातीमधील केवळ तीन डाॅल्फिन हे भारतामध्ये शिल्लक राहिले आहे (indus river dolphin). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार दि. ३ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या डाॅल्फिन गणना अहवालाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे (indus river dolphin). शिल्लक राहिलेल्या तीन इंडस रिव्हर डॉल्फिनचा पंजाबमधील बियास नदीत अधिवास आहे. (indus river dolphin)
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या डॉल्फिनच्या गणनेचा अहवाल प्रकाशित झाला. यामध्ये भारतात गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या डाॅल्फिनच्या गंगेज रिव्हर डाॅल्फिन आणि इंडस रिव्हर डाॅल्फिन या दोन प्रजातीच्या संख्येचा अंदाज मांडण्यात आला आहे. डाॅल्फिनच्या या दोन्ही प्रजात आययूसीएनच्या लाल यादीत संकटग्रस्त म्हणून नामांकित करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतात गंगेज रिव्हर डाॅल्फिनच्या संख्या ६ हजार ३२४ असून इंडस रिव्हर डाॅल्फिनची संख्या तीन आहे.
इंडस रिव्हर डाॅल्फिनला सिंधू नदी डाॅल्फिन असेही म्हटले जाते. सध्या भारतामध्ये या प्रजातीचा अधिवास केवळ पंजाब राज्यातील बियास या नदीमध्ये शिल्लक राहिला आहे. ही नदीच्या सर्वसाधारण खोली ही २.२ मीटर असून तिची रुंदी २३८ मीटर आहे. १९६० साली डाॅल्फिनची ही प्रजात भारतामधून नामशेष झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, २००७ साली ही प्रजात पुन्हा एकदा भारतात आढळून आली. पंजाब वन विभाग आणि डब्लूडब्लूएफ - इंडिया या संस्थेने २०१८ साली बियास नदीत इंडस रिव्हर डाॅल्फिनसंदर्भात सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये त्यांना सहा डाॅल्फिन आढळून आले. मात्र, २०२२ साली या अहवालासाठी केलेल्या सर्वेक्षणामध्ये केवळ तीन डाॅल्फिन आढळून आले आहेत. बियास नदीमधील १०१ किलोमीटर परिसरात हे सर्वेक्षण पार पडले. तीन डाॅल्फिनमधील दोन प्रौढ आणि एक नवजात डाॅल्फिनचा समावेश होता. मात्र, मार्च २०२४ रोजी यामधील एका मादी डाॅल्फिनचा मृत्यू झाल्याची माहिती पंजाब वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. या मादीच्या शवविच्छेदनावेळी तिच्या पोटात अर्भक सापडले आहे.