विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाचा ‘छावा’ तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार, ७ मार्चला थेटगृहांत भेटीला!
03-Mar-2025
Total Views |
मुंबई : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘छावा’ या गाजलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची तेलुगू आवृत्ती ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये मोठा यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी तो तेलुगूमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला आहे. या आवृत्तीचे वितरण प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद यांच्या गीता आर्ट्सद्वारे केले जाणार आहे. 'छावा’च्या तेलुगू आवृत्तीचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला आणि त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत अधिक वाढ केली.
विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिलेल्या दमदार अभिनयाने इतिहास जिवंत केल्याची भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. हिंदी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या ‘छावा’ने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे हा भव्य ऐतिहासिक चित्रपट तेलुगूमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माण झालेल्या आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय उलगडणाऱ्या या चित्रपटात संभाजी महाराजांचे धैर्य, त्यांचे युद्धकौशल्य आणि औरंगजेबाच्या विरोधातील त्यांचा संघर्ष ताकदीने मांडण्यात आला आहे.
हिंदीसह इतर भाषांमधील (तमिळ, कन्नड, मल्याळम) चित्रपट तेलुगू प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत असल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्मातेही आता तेलुगू बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यातच, रश्मिका मंदान्ना ही तेलुगू प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय असल्यामुळे ‘छावा’बद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्यावर मुघल आक्रमणाचे संकट गडद होत असतानाच त्यांच्या वारसा आणि लढाऊ वृत्तीचे प्रतीक म्हणून संभाजी महाराजांचा उभारलेला संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. "शेर नही रहा लेकीन छावा अभीभी जंगल मे घुम रहा है" हा दमदार संवाद प्रेक्षकांच्या काळजाला भिडतो. विकी कौशलने संभाजी महाराजांची पराक्रमी भूमिका साकारत जबरदस्त युद्धदृश्ये सादर केली आहेत.
यामध्ये अक्षय खन्ना यांनी मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदान्ना यांनी राणी येसुबाईंची भूमिका साकारली आहे. ७ मार्चला तेलुगू प्रेक्षकांना हा भव्य ऐतिहासिक चित्रपट थेटगृहांत अनुभवता येणार आहे.