बीड : (Santosh Deshmukh Case) बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अजूनही बीडमध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनं सुरु आहेत. अशातच आता या प्रकरणातील पहिला जामीन मंजूर झाला आहे.मकोका लावण्यात आलेल्या आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याने सीआयडीने आरोपपत्रात त्याच्या नावाचा समावेश केलेला नाही. २५ हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
गेल्याच आठवड्यात सीआयडीकडून या प्रकरणी १८०० पानांचे दोषारोपपत्र बीड सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. संतोष देशमुखांच्या हत्येचा मूख्य सुत्रधार वाल्मिक कराडच असल्याचे सीआयडीने या दोषारोपपत्रातून स्पष्ट केले आहे. या आरोपपत्रात खंडणी, अॅट्रोसिटी आणि हत्या या तिन्ही प्रकरणांचा तपशील एकत्रित देण्यात आला आहे. सीआयडीच्या तपासात या तिन्ही घटना एकमेकांना पूरक असल्याचे लक्षात आल्यानंतर या तिन्ही प्रकरणांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. हे सर्व गुन्हे संलग्न असून एकमेकांशी संबंधित असल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.तसेच संतोष देशमुख यांची हत्या ही अवादा कंपनीच्या खंडणीच्या वादातूनच करण्यात आल्याचे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, संतोष देशमुखांचा ठावठिकाणा आरोपींनी कळवल्याचा आरोप असलेल्या सिद्धार्थ सोनवणे याची सुटका करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तो सध्या बीड जिल्हा कारागृहात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आता त्यांची सुटका होणार आहे.