मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात विविध ठिकाणी आगीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईतील फिल्मसिटीमध्ये एका टीव्ही शोच्या सेटला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत, सोनी सब वाहिनीवरील ‘तेनाली रामा’ या मालिकेच्या सेटवर २ मार्च रोजी, रविवारी सकाळी आग लागली.
स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेटच्या मागील भागात ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत सेटच्या मागील भागाला काहीसं नुकसान झालं असलं, तरी मोठी हानी झाल्याची माहिती नाही. मात्र, या आगीमुळे काही काळ शूटिंग थांबवावं लागलं.
शूटिंग तब्बल २ तास थांबवावे लागले:
महत्त्वाची बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागल्यानंतर शूटिंग तब्बल दोन तास थांबवण्यात आलं. मात्र, सेटवरील प्रोडक्शन टीम आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत अग्निशमन दलाच्या येण्यापूर्वीच आगीवर बर्याच प्रमाणात नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पहिल्या सिझनला मोठे यश:
‘तेनाली रामा’ मालिकेचा पहिला हंगाम प्रचंड यशस्वी ठरला होता. त्यानंतर या मालिकेचा दुसरा सिझन डिसेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिपोर्ट्सनुसार, या शोचे आतापर्यंत ८६४ भाग प्रसारित झाले असून मालिकेला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेत कृष्ण भारद्वाज, प्रियमवदा कांत, मानव गोहिल, पंकज बेरी आणि नेहा चौहान यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.