मुंबई लोकलची सारथी

Total Views |

article on motorwoman preeti kumari
 
भारतीय रेल्वेमध्ये सरळसेवा भरतीतून थेट नियुक्ती झालेल्या आणि पश्चिम रेल्वेवरील पहिल्या मोटारवुमन प्रीती कुमारी यांच्याविषयी....
 
मुलींना शिकवून काय होणार आहे? मुलगी तर परक्याचे धन, पूर्वापार चालत आलेली ‘हुंडा’पद्धती त्यामुळे मुलींच्या शिक्षणावर फार खर्च नकोच, असे वातावरण १९-२० सालच्या दशकात बिहार, झारखंडच्या ग्रामीण भागात सर्रास दिसून यायचे. अशा काळात बिहारमधील ‘छोर’ या एका छोट्या गावात, शेतकरी कुटुंबात प्रीती कुमारी यांचा जन्म झाला. आईवडील दोघेही सुशिक्षित असल्याने, आपल्या सर्व मुलांनी उच्चशिक्षित असावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आईंनी मुलांच्या संगोपनावर बारकाईने लक्ष दिले. प्रीती कुमारी सांगतात,त्या लहान असताना पीटी उषा यांचे नाव खूप अभिमानाने घेतले जायचे. त्यावेळी आईने त्यांना पीटी उषा यांच्या संघर्षाच्या, अनेक गोष्टी सांगितल्या. हीच प्रेरणा घेऊन त्यासुद्धा जिद्दीने अभ्यास करायच्या.
 
बिहार स्टेट बोर्डमधून, प्रीती कुमारी यांनी आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण छोर या गावातच पूर्ण केले. विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण करत, प्रीती कुमारी यांनी ‘इलेक्ट्रॅनिक इन्स्ट्रुमेशन अ‍ॅण्ड कंट्रोल’ या विषयातून, डिप्लोमा केला. प्रीती या उच्च शिक्षण घेण्यासाठी गावापासून आणि घरापासून दूर जाणार असल्याने, या काळात कुटुंबालाही गावातील नागरिकांच्या मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. छोर गावातून शहरात शिक्षणासाठी जाणार्‍या, प्रीती कुमारी या पहिल्या महिला आहेत. गावकर्‍यांचा विरोध पाहता, प्रीती यांना महिला पॉलिटेक्निकल महाविद्यालयातच प्रवेश घेणे आवश्यक झाले. त्यावेळी झारखंड आणि बिहार मिळून एकच राज्य होते. या राज्यात, केवळ एकच महिला पॉलिटेक्निकल महाविद्यालय होते. प्रीती कुमारी या महाविद्यालयातील ९७व्या बॅचच्या विद्यार्थिनी आहेत. प्रीती कुमारी यांनी महाविद्यालयातून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होत, आपले शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच, प्रीती कुमारी यांचा विवाह झाला.
 
प्रीती कुमार यांचा विवाह पाटणा येथील, आरा गावातील कुटुंबात झाला. प्रीती कुमारी यांचे सासरे स्वतः अध्यापक होते, त्यामुळे संपूर्ण कुटुंबही सुशिक्षित होते. प्रीती कुमारी यांचे पती, इंडियन एअर फोर्समध्ये कार्यरत होते. लग्नानंतर प्रीती कुमारी यांच्या आकांक्षांना, थोडा आवर घालावा लागला. कारण, रेल्वे भरतीसाठी अर्ज भरायचा म्हणजे जिथे सेंटर येईल, तिथे परीक्षेला उपस्थित राहणे बंधनकारक होते. यासाठी कुटुंबातून फारशी सकारात्मकता नसल्याने, प्रीती कुमारी यांनी हा विषय सोडला. मात्र, पती एअरफोर्समध्ये असल्याने, ‘बीए’करून ‘बीएड’ केल्यास जिथे त्यांची पोस्टिंग असेल, त्याठिकाणी एअर फोर्सच्या शाळेत आपणही नोकरी करू असा विचार करून, प्रीती यांनी ईग्नूमध्ये प्रवेश घेतला. या दरम्यान, २००२ साली मुलीचा जन्म झाल्याने, प्रीती कुमारी यांच्या शिक्षणात खंड पडला. २००६ साली त्यांनी बीए पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
 
प्रीती कुमारी यांच्या पतींना कर्तव्यावर असताना छातीत खोलवर जखम होऊन, गाठ झाली होती. मात्र, त्याचे निदान होण्यास उशीर झाला. २००६ साली निदान झाले; मात्र पुढील एकाच वर्षात या आजाराचे एका गंभीर आजारात रूपांतर झाले. या काळात प्रीतीकुमारी यांच्या पतीची पोस्टिंग आणि उपचार, नाशिकमध्ये सुरू होते. पती पूर्णकाळ उपचारासाठी रुग्णालयात आणि मुलगीही एलकेजीमध्ये जाऊ लागली होती. यावेळी प्रीती कुमारी यांना जाणीव झाली की, आता कोणत्याही परिस्थितीत कुटुंबाला आधार देण्यासाठी नोकरी करावीच लागणार. बीए करताना प्रीती कुमारी यांनी जाणीवपूर्वक, ‘इतिहास’ हा विषय घेतला. जेणेकरून सामान्यज्ञान विषय पक्का करून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणे शक्य होईल. याचाच पुढे त्यांना फायदाही झाला.
 
२००८ साली रेल्वेच्या सरळसेवा भरतीची जाहिरात निघाली. यावेळी कोणताही विचार न करता प्रीती कुमारी यांनी मुंबई हे सेंटर निवडून , परीक्षेसाठी अर्ज भरला. परीक्षा झाली आणि प्रीती कुमारी यांनी, पहिल्याच प्रयत्नात रेल्वे भरतीचीही परीक्षा पास केली. भरती प्रक्रियेतील अंतिम फेरी पार करून प्रीती कुमारी यांचा, पश्चिम रेल्वेवरील पहिली महिला मोटरमन म्हणून रुजू होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. सहा महिने वर्कशॉपमध्ये राहून संपूर्ण गाडीची माहिती घेणे, हा ट्रेनिंगचा पहिला भाग होता. त्यानंतर वरिष्ठ मोटरमनच्या देखरेखीत गाडी चालविण्याची, स्थानकांची आणि ट्रॅकची माहिती घेणे हे सर्व होते. शेवटचे दोन महिने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात, गाडी चालवण्याचा सराव केला जातो. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता, एक मोटरमन तयार करण्यासाठी भारतीय रेल्वे खूप मेहनत घेते, असे प्रीती कुमारी आवर्जून सांगतात.
 
प्रीती कुमारी पश्चिम रेल्वेची पहिली महिला मोटरमन ठरल्या. २००९ साली प्रीती कुमारी पश्चिम रेल्वेमध्ये रुजू झाल्या. दि. १२ ऑक्टोबर २०१० रोजी २ वाजून, १० मिनिटांची ‘चर्चगेट-बोरिवली स्लो लोकल’ चालविणारी पश्चिम रेल्वेची पहिला मोटरमन होण्याचा बहुमान, प्रीती कुमारी यांना मिळाला. बिहारमधील कुटुंबापासून दूर राहून उच्च शिक्षण पूर्ण करणारी गावातील पहिली मुलगी, मुंबईची लाईफलाईन लोकल चालवत होती. गावकर्‍यांचा प्रचंड विरोध स्वीकारून, मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या आई-वडिलांमुळेच मी हे प्रगती साधली, हे प्रीती कुमारी अत्यंत गर्वाने सांगतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितून शिक्षण पूर्ण करून, यशाचे शिखर गाठणार्‍या प्रीती कुमारी यांचा पहिली महिला मोटरमन होण्यापर्यंतचा प्रवास, अनेक महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. प्रीती कुमारी यांना भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!
 
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.