लाडक्या बहीणींची प्रतिक्षा अखेर संपणार, मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा!
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्चला खात्यात जमा होणार
03-Mar-2025
Total Views |
मुंबई : (Ladki Bahin Yojana) राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2025) सोमवार दि. ३ मार्च रोजी सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माध्यमांशी संवाद साधताना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला होता. दरम्यान, मंत्री आदिती तटकरे यांनी येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करणार असल्याचे सांगितले.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त मंत्री आदिती तटकरे विधीमंडळात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याविषयी माहिती दिली. आदिती तटकरे म्हणाल्या, “येत्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विधीमंडळाचे विशेष सत्र होणार आहे. त्यादिवशी शनिवार असूनही हे सत्र होणार आहे. खास महिला लोकप्रतिनिधींसाठी व राज्यातील महिलांसाठी हे सत्र असणार आहे. याशिवाय राज्यातील जनतेची लाडकी योजना म्हणजेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबतही महत्त्वाची माहिती जनतेला द्यायची आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ मार्च रोजी वितरीत केला जाणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. येत्या आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत. महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत”.
विरोधकांच्या आरोपांवर आदिती तटकरे काय म्हणाल्या?
"विरोधक सुरुवातीपासून आरोप करतच आहेत. आम्ही जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा दोन कोटींपेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेऊ शकल्या आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थी महिला आहे, त्या त्याच प्रमाणे राहतील. योजना जाहीर झाल्यापासून ही योजना विरोधकांना खुपत आहे आणि गेल्या ५-६ महिन्यांपासून ज्याप्रकारे महिलांचा प्रतिसाद मिळत आहे, तो पाहिल्यानंतर विरोधकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. तेच नैराश्य विरोधक बहिणींमध्ये पसरवताना दिसत आहे. पण महायुतीचं सरकार सक्षम आहे.’
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारे महायुतीचे सरकार यापुढेही ‘लाडकी बहीण योजना’ अशाच प्रकारे सक्षमपणे कार्यरत ठेवणार आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.