देश सोडून पळणारा घोटाळेबाज गजाआड

    03-Mar-2025
Total Views |

sukhvinder kharoor
 
नवी दिल्ली : ( Sukhwinder Singh kharoor ) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘ईडी’ने ३ हजार ५५८ कोटी रुपये कथित घोटाळ्याचा मास्टरमाईंड सुखविंदर सिंग खरूर आणि डिंपल खरूर यांना अटक केली आहे. हे दोघेही देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, ‘लुक आऊट’ नोटिसीमुळे विमानतळावरच दोघांना रोखण्यात आले. ‘व्यूनाऊ मार्केटिंग सर्व्हिसेज लिमिटेड’ आणि त्याच्याशी निगडित कंपन्यांविरोधात मनी लॉण्ड्रिंगअंतर्गत तपास सुरू आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली.
 
‘ईडी’ने सुखविंदर आणि डिंपलला अटक केल्यानंतर जालंधरच्या न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने दोघांना ‘ईडी’ची कोठडी सुनावली आहे. हा घोटाळा ‘क्लाऊड पार्टिकल घोटाळा’ नावाने ओळखला जातो. ज्यात गुंतवणूकदारांना खोटी प्रलोभने देत त्यांना ‘सेल अ‍ॅण्ड लीज बँक मॉडेल’ च्या माध्यमातून फसवण्यात आले. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची प्राथमिक चौकशी करताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर ‘ईडी’ने यावर कारवाई करत तपासात सुखविंदर सिंग खरूर आणि त्याच्या सहकार्‍यांनी मिळून हा घोटाळा केल्याचे उघड झाले.