समुद्रकिनार्यावरील जागेचा व्यावसायिक उपयोग होणार!
मंत्री नितेश राणेंची संकल्पना; शासनाचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न
03-Mar-2025
Total Views |
मुंबई : “राज्यातील विशेषतः मुंबई शहराला लागून असलेल्या समुद्र किनार्यावरील जागेचा जाहिराती, करमणूक आणि चित्रीकरणासाठी व्यावसायिकांनी उपयोग करून शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात,” असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी दिले आहेत.
‘इंडियन मर्कटाईल चेंबर्स’ येथे मत्स्यव्यवसायमंत्री राणे यांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’ची आढावा बैठक पार पडली.
यावेळी ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मुख्य अभियंता राजाराम गोसावी, वित्त नियंत्रक व मुख्य लेखाधिकारी सारंगकर, उपजिल्हाधिकारी अंजली भोसले, महाव्यवस्थापक रोहित पुरी, उपसंचालक (आशियाई विकास बँक) डॉ. महेश चंदूरकर उपस्थित होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले की, “महाराष्ट्राला व मुंबईला भव्य व निसर्गसंपन्न समुद्रकिनारा लाभलेला आहे. या जागांचा योग्य नियोजनातून विकास करून त्याचा उपयुक्त वापर करण्यात यावा, जेणेकरून ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’ला कायमस्वरूपी महसूल उपलब्ध होईल. तसेच या जमिनींचा औद्योगिक, आर्थिक, पर्यटन, तसेच इतर महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी उपयोग करण्यावर भर द्यावा,” असेही त्यांनी सांगितले.
‘वॉटर मेट्रो’बाबत सकारात्मक
‘कोची मेट्रो’ यांनी केरळमध्ये बॅक वॉटरचा वापर करून ‘मेट्रो’चे जाळे निर्माण केले आहे. त्याच धर्तीवर मुंबई, ठाणे या परिसरातील नद्यांच्या पाण्यात वॉटर मेट्रोसेवा सुरू केल्यास वाहतुककोंडी कमी करण्यास मदत होईल, असा प्रस्ताव ‘कोची मेट्रो’च्या प्रतिनिधींनी मांडला. या प्रस्तावास निलेश राणे यांनी अनुकूलता दर्शविली.
आज मेरिटईम बोर्ड कार्यालयात कोची मेट्रो आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोची मेट्रो यांच्यावतीने केरळ मध्ये बॅक वॉटरचा वापर करून मेट्रोचे जाळे निर्माण केले आहे. त्याच धर्तीवर मुंबई, ठाणे या परिसरातील नद्यांच्या पाण्यात वॉटर मेट्रोसेवा सुरू केल्यास वाहतुकीची कोंडी कमी होण्यास… pic.twitter.com/XLcpMc2Q4n
तसेच ‘क्रिसील’ या संस्थेच्यावतीने राज्यात नौकानिर्मिती करण्याबाबत राज्याचे धोरण ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये नौकानिर्मिती व नौका नष्ट करणे अशा प्रकारचे काम महाराष्ट्रात जर सुरू झाले, तर अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मत संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. “या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,” असे आश्वासन नितेश राणे यांनी दिले.