मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Shri Guruji Puraskar 2025) "भक्तिभावाचे नाव आध्यात्म आहे आणि संवेदना, करुणा हे अध्यात्माचे मूळ आहे. नुकताच प्रयागराज येथे झालेला महाकुंभ हेही अध्यात्मभावाचेच प्रगटीकरण आहे. करुणा, प्रेम, समर्पण हे भाव कुंभामध्ये दिसले. कुंभ हा ऐक्याचे प्रतीक आहे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी केले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती'तर्फे आयोजित 'पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार' प्रदान समारंभ नुकताच बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
हे वाचलंत का? : संघ समजण्याचे माध्यम म्हणजे स्वयंसेवक होणे : रमेश पतंगे
उपस्थितांना संबोधत डॉ. कृष्णगोपालजी म्हणाले, "सर्व काही सरकार करेल, ही पाश्चात्य आणि चुकीची धारणा आहे. सुरक्षा, न्याय अशा काही व्यवस्था आणि छोटी, मोठी कामे सरकार निश्चितपणे करेल. परंतु, समाजासाठी आवश्यक प्रत्येक काम करणे हे समाजाचेच दायित्व आहे. हा विश्वास समाजात पुनर्स्थापित करूया. यासाठीच 'जनकल्याण समिती' सारख्या संस्थांचे कार्य अधिक गतीने पुढे जाणे आवश्यक आहे. त्यातूनच समाज प्रगती करेल," असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, "संघाचे कार्यकर्ता निर्माणाचे कार्य प्रारंभीची अनेक वर्षे समाजाच्या लक्षातच आले नाही. संघ युवकांची शक्ती वाया घालवत आहे, अशीही टीका त्या काळात झाली. परंतु, नंतर समाजाविषयीची तळमळ आणि समाजाचे दुःख हे आपले दुःख मानून संघ स्वयंसेवकांनी हजारो सेवाकार्ये सुरू केली. त्याचा लाखोजणांना लाभ झाला. समाजात जाऊन आवश्यक सेवाकार्य करण्याची ही संघाची कार्यशैली अद्भुत ठरली."
कार्यक्रमादरम्यान राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील 'गोयल ग्रामीण विकास संस्थान' आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी 'श्री संकेश्वर पीठा'चे श्री स्वामी शंकराचार्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते. शाल, श्रीफल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
"गोयल ग्रामीण विकास संस्थान'तर्फे सेंद्रीय शेती आणि त्या विषयातील संशोधनाचे महत्त्वपूर्ण तसेच सफल कार्य सुरू आहे. त्याचे मॉडेल देशात ठिकठिकाणी दाखवण्याचे प्रयत्न झाले, तर शेतकन्यांना मोठा लाभ होईल," असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष ताराचंद गोयल यांनी व्यक्त केला.
"हॉकीमध्ये मी जी कामगिरी करू शकलो, त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करणारा खेळाडू तयार करणे आणि देशासाठी असा खेळाडू शोधणे हे माझे लक्ष्य आहे. हॉकीमध्ये कांस्य पदकाकडून सुवर्ण पदकाकडे आपल्या देशाची कामगिरी करण्याचे आमचे ध्येय आहे," असे मनोगत पी. आर. श्रीजेश यांनी व्यक्त केले. "जगात भारताला 'विश्वगुरू' हा सन्मान निश्चितपणे प्राप्त होईल," असा विश्वास श्री स्वामी शंकराचार्य यांनी व्यक्त केला.
'जनकल्याण समिती'चे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी प्रास्ताविक केले. समितीचे सहकोषाध्यक्ष चंदन कटारिया यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. 'सेवा भारती' संस्थेचे सचिव प्रदीप सबनीस यांनी आभार प्रदर्शन आणि डॉ. प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.