पु. ल. देशपांडे म्हणजे राज्याचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स

    03-Mar-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
मुंबई: ( Devendra Fadanvis ) महाराष्ट्राचा हॅप्पीनेस इंडेक्स म्हणून पु. ल. देशपांडे यांचे कार्य असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भर त्यांनी घातली आहे. त्यांच्या विनोदबुद्धी आणि भाषाशैली तसेच त्यांच्या साहित्यातून मिळणारा आनंद निखळ होता. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मराठी कलाकार, रसिकांचे योगदान मोठे असून संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, भीमसेन जोशी, आशा भोसले, नाटक-सिनेमा क्षेत्रात श्रीराम लागू, निळू फुले, तर साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, त्याचबरोबर लोककला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यातून मोठे योगदान दिले आहे. संस्कृती आणि सभ्यता यांचे मूल्यमापन त्याठिकाणी जोपासल्या गेलेल्या साहित्य, संस्कृती आणि भाषेमुळे होते,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या नूतनीकृत संकुलाचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. २ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, आ. कालिदास कोळंबकर, भाई गिरकर, अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’चे संचालक मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, “मराठी माणसाने नाटकाप्रति आपले प्रेम जोपासले आहे. नाटकाचे अनेक प्रयोग होतात, देशात या क्षेत्रात मराठी कलावंतांचे काम महत्त्वाचे आहे. गायक, कवी, साहित्यिक, कवी यांनी आपली कला, साहित्य, संस्कृती यांचे जतन करून आपल्या लोकांचे जीवन समृद्ध केले,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.