महायुतीचे सरकार कपिल पाटील यांना ताकद देईल : गणेश नाईक
03-Mar-2025
Total Views |
कल्याण: ( ganesh naik on kapil patil ) प्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंग येत असतात. मात्र, आता कपिल पाटील हे सतर्क आहेत. त्यांना समाजजीवनात मानाचे स्थान असून, राज्याच्या कानाकोपर्यात ओळखणारा वर्ग आहे. माझ्यासह महायुतीचे सरकार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना कायम ताकद देईल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
भारतीय टेनिस क्रिकेट विश्वात सर्वात मोठी असलेल्या मा. केंद्रीय राज्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते माणकोली येथील श्री गुरुदत्त चवठा हिरवा मैदानावर शनिवार, दि. 1 मार्च रोजी शानदार उद्घाटन झाले. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मंत्री नाईक बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेली फटकेबाजी प्रेक्षकांना पाहावयास मिळाली. या स्पर्धेत दोन फोर व्हिलर मोटारी व 51 बाईक विजेते व भाग्यवान प्रेक्षकांना बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे क्रिकेट खेळाडूंमध्ये स्पर्धेबाबत उत्सुकता आहे.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी भव्य क्रिकेट स्पर्धा भरविली जाते. यंदाही ‘भाजप कपिल पाटील फाऊंडेशन’, सिद्धिविनायक अंजुर, ‘जॉयकुमार युवा प्रतिष्ठान’, एकविरा स्पोर्ट्स, गुरुदत्त चवठा हिरवा, दिवा स्पोट्सर्र् यांच्यावतीने आयोजित केलेल्या माजी केंद्रीय ‘राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025’ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतशबाजी आणि आकाशात फुगे सोडून स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या उद्घाटन समारंभात गणेश नाईक बोलत होते. यावेळी प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, हेमंत घरत, स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख प्रताप पाटील, राम माळी, भानुदास पाटील, अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघासह ठाणे जिल्ह्याच्या विकासात कपिल पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
जिल्हा परिषदेच्या सभापतीपासून केंद्रीय राज्यमंत्रिपदापर्यंतचा कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास पाहिला. राजकीय क्षेत्राबरोबरच समाजाच्या विविध स्तरांतही त्यांना मानणारा वर्ग आहे. केंद्रीय राज्यमंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या कानाकोपर्यात ओळख निर्माण केली. देशभरात पंचायती राज व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसर्यांदा नेतृत्व करीत देशाचा सन्मान वाढविला. राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध विकास सुरू केला आहे, असे नमूद करीत गणेश नाईक यांनी आमदारकी-खासदारकी अळवावरचे पाणी असते. पण, प्रामाणिकपणे कार्य करणार्या कार्यकर्त्याला पाठिंबा देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारबरोबरच माझ्याकडून कपिल पाटील यांना ताकद दिली जाईल, अशी ग्वाही गणेश नाईक यांनी दिली.