महाकुंभात हरवलेल्या ५४ हजार भाविकांचे पुनर्मिलन

"डिजिटल खोया-पाया केंद्रा"ने बजावली महत्त्वाची भूमिका

    03-Mar-2025
Total Views |


Mahakumbh Digital Khoya Paya Centre

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Digital Khoya Paya Center)
प्रयागराज येथे पौष पौर्णिमेपासून सुरु झालेला महाकुंभ अत्यंत दिव्यतेने आणि भव्यतेने संपन्न झाला. या ऐतिहासिक धार्मिक मेळाव्यात ६६ कोटींहून अधिक भाविकांनी श्रद्धेने स्नान केले. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या दूरदृष्टी आणि समर्पित प्रयत्नांमुळे कुंभमेळ्यात हरवण्याची संकल्पना एकाअर्थी मोडीस निघाली. सरकारने राबविलेल्या 'खोया पाया' अभियानामुळे आपल्या प्रियजनांपासून विभक्त झालेल्या ५४,३५७ लोकांना पुन्हा एकत्र करण्यात प्रशासनाला यश आल्याचे निदर्शनास आले आहे.

हे वाचलंत का? : महाकुंभ हे अध्यात्मभावाचेच प्रगटीकरण : डॉ. कृष्णगोपालजी

मिळालेल्या वृत्तानुसार, प्रियजनांपासून विभक्त झालेल्यांमध्ये बहुतांश संख्या महिलांची होती. भारत आणि नेपाळच्या विविध राज्यांतून आलेल्या भाविकांना त्यांच्या कुटुंबियांसोबत जोडण्यातही पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये योगी सरकारच्या ‘डिजिटल खोया पाया सेंटर’ची स्थापना ही एक मोठी उपलब्धी होती. या केंद्राद्वारे ३५ हजार हून अधिक विभक्त भाविकांना त्यांच्या कुटुंबियांशी त्वरित जोडण्यात आले.

मकर संक्रांतीच्या अमृतस्नान कालावधीत दि.१३ ते १५ जानेवारीदरम्यान ५९८ हरवलेले लोक त्यांच्या प्रियजनांना भेटले. मौनी अमावस्या कालावधीत (जानेवारी, २८ ते ३० दरम्यान) ८,७२५ लोक त्यांच्या प्रियजनांसोबत पुनर्मिलन झाले आणि बसंत पंचमी (२ ते ४ फेब्रुवारी) दरम्यान ८६४ विभक्त भक्तांना त्यांच्या प्रियजनांशी पुन्हा भेट देण्यात आली. अन्य दिवशी झालेल्या पवित्र स्नानादरम्यान हरवलेले २४,८९६ लोक पुन्हा कुटुंबीयांशी जोडले गेले.