केडीएमसी- डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून स्वच्छता अभियान

अभियानात आ. रविंद्र चव्हाण, राजेश मोरे यांचा सहभाग

    03-Mar-2025
Total Views |
 
kdmc ravindra chavan
 
डोंबिवली: ( KDMC ) महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब तथा नारायण विष्णु धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्ममाने डोंबिवलीत ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात आ. रविंद्र चव्हाण आणि राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, मंदार हळबे, कृष्णा पाटील, पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, रामनगर पोलीस स्थानकचे उपनिरीक्षक जी. आर. गाडेकर यांनी सहभाग घेतला होता.
 
‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष ‘पद्मश्री’ दत्तात्रेय धर्माधिकारी व डॉ. सचिन दत्तात्रेय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. हे अभियान फक्त डोंबिवली शहर विभागापुरतेच नसून, संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राज्यांमधूनही पार पडले. ‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’तर्फे ‘स्वच्छता अभियाना’सारख्या जनजागृती उपक्रमाबरोबर एकूण ४६ प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम जसे वृक्ष लागवड व संवर्धन, जल पुनर्भरण, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, कॅन्सर जनजागृती, प्लाझमा डोनेशन, निर्माल्य संकलन आणि खत निर्मिती आदी उपक्रम राबविले जातात. या प्रतिष्ठानचे कार्य केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरील अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, कतार, दुबई या राष्ट्रांमध्येही राबविले जाते.
 
मानवी आरोग्यासाठी जशी शुद्ध हवा, शुद्ध पाणी हवे असते. तसेच, पर्यावरणाचे होणारे प्रदूषणाची जाणीव सर्वसामान्यांना होणे, तसेच अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारचे आजार व साथीचे रोग पसरतात. त्यासाठी औषधोपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. काही वेळेला जीवितहानीसुद्धा होते. याबाबतची जनजागृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे, या हेतूने या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
 
‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’, रेवदंडा जि. रायगडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छता अभियाना’त एकूण २ हजार, ९६५ सदस्यांनी सहभाग घेतला. ओला व सुका कचरा मिळून एकूण २९ टन घनकचरा उचलण्यात आला. एकूण ९६ किमी रस्ते सफाई करण्यात आली.