इस्लामाबाद : पाकिस्तानात अन्न आणि इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तानी जनतेतील गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अन्नाचा तुटवडा आणि गॅसच्या कमतरतेमुळे लोकांच्या जीवनाचे हाल बेहाल होऊन बसले आहेत. विशेष म्हणजे कराचीत दिवसेंदिवस वाईट परिस्थिती निर्माण होत चालली आहे. रमजान महिन्यातही पाकिस्तानी लोकांना दिलासा मिळेल असे चित्र होते. मात्र आता परिस्थिती आणखी बिकट निर्माण झाली आहे.
अशा स्थितीत पाकिस्तानात धान्य, चपाती-भाकरी आणि ब्रेडच्या किंमतीत वाढ होते. अशातच आता कराचीचे आयुक्त सय्यद हसन नक्वी यांनी एक अधिसूचना जारी केली असून अन्न धान्यांचेही दर निश्चत केले आहेत. पीठाच्या घाऊक विक्रीत प्रति किलो ८३ रुपये आणि किरकोळ विक्रीत प्रति किलो ८७ रुपये दर होता. तर चक्कीद्वारे दळण्यासाठी पिठाचा दर १०० रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आला.
रमजानमध्ये दिलासा देण्यासाठी आयुक्तांनी किराणा मालाच्या किंमतीही निश्चित केला. तसेच दररोज सकाळी नवीन दराच्या किंमतीची यादी जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली. तक्रारीसाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली. दुकानदारांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत की,जेणेकरून निर्धारित किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारल्यास दंडासह अटकेची शिक्षा असेल.
एकीकडे गॅसचा पुरवठा कमी असल्याने पाकिस्तानी त्रस्त आहेत. यामुळे अन्नपदार्थाची तीव्र टंचाई निर्माण होत आहे. सेहरी आणि इफ्तारसारख्या परिस्थितीत गॅस उपलब्ध नसतो. त्यामुळे स्वयंपाक करणे कठीण होऊन बसते. कराचीतील लियाकताबाद, उत्तर नाझिमाबाद आणि गुलशन-ए-इकबालसारख्या इतर भागातील लोकांना गॅस कपातीचा त्रास सहन करावा लागला आहे.
याचीच दखल घेत पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सेहरी-इफ्तार दरम्यान, गॅस पुरवठा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सुई सदर्न गॅस कंपनीने गॅसचा एकूण दाब १० टक्के वाढवण्याचे आणि नियंत्रण कक्ष बांधण्याचे आश्वसन दिले आहेत.