गुंतवणुकदारांना तब्बल ४५०० कोटींचा गंडा घालणाऱ्या पॅनकार्ड क्लबवर छापे

मुंबई आणि दिल्ली येथील कार्यालयांवर ईडीकडून छापे

    03-Mar-2025
Total Views |

ed
 
 
मुंबई : गुंतवणुकदारांना तब्बल ४५०० कोटींचा गंडा घालणाऱ्या पॅनकार्ड क्लबवर सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीकडून २५ फेब्रुवारी रोजी छापे पडले आहेत. या कंपनीच्या मुंबई आणि दिल्ली येथील कार्यालयांवर हे छापे पडले आहेत. सक्तवसुली संचालनालयाच्या म्हणण्यानुसार या कंपनीकडून ५० लाख गुंतवणुकदारांचे तब्बल ४५०० कोटी रुपये बुडवले आहेत. मनी लाँड्रिंग कायदा २००२ च्या अन्वये ही कारवाई झाली आहे. सध्या या कंपनीच्या मुंबई आणि दिल्ली येथील सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
 
या छाप्यांच्या दरम्यान हस्तगत करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये कंपनीचे दिवंगत संचालक आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुधीर मोरवेकर आणि त्याच्या कुटुंबीयांकडून परदेशी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. या मालमत्ता भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवले जात होते. असे ईडी कडून सांगण्यात आले आहे.
 
या प्रकरणी ईडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आपीसी १८६० च्या अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. यात पॅनकार्ड क्लब आणि त्याच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आता सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
 
पॅनकार्ड क्लबने रिझर्व्ह बँकेचे नियम धाब्यावर बसवून ३-९ वर्षांच्या विविध गुंतवणुक योजना सुरु केल्या होत्या. या योजनांमध्ये हॉटेल विमा, अपघात विमा, यांसारख्या योजनांचा समावेश केला होता. या सर्व योजनांवर उच्च परताव्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते. या सर्व जमा झालेल्या ठेवींमधून या कंपनीच्या संचालकांनी बेहिशिबी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. असे या तपासात उघड झाले आहे.