पुणे आणि मुक्ताईनगरच्या घटनेवर चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप, म्हणाल्या...
03-Mar-2025
Total Views |
मुंबई : केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींचीच नाही तर सर्वसामान्य महिला आणि मुलींची सुरक्षा ही महायुती सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली.
सोमवार, ३ मार्च रोजी विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चित्रा वाघ म्हणाल्या की, "पुणे आणि मुक्ताईनगरच्या दोन्ही घटना वेदनादायी आहेत. पुण्याच्या घटनेने बंद पडलेल्या एसटी, त्यांचा दुरुपयोग आणि एसटीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ एक मानक कार्यप्रणाली (एसओपी) बनवली असून त्यानुसार काम सुरु झाले आहे. आम्ही महिला म्हणून त्यांना दिलेल्या सूचनादेखील मान्य झाल्या आहेत. येणाऱ्या दिवसांत महिला आणि मुलींचा एसटीतील प्रवास सुरक्षित आणि सुखकर होणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक झाली असून नवीन नवीन माहिती पुढे येत आहे. येणाऱ्या दिवसांत आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे."
"काल एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची आणि तिच्या मैत्रीणींची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला. या घटनेतील आरोपींनाही तात्काळ अटक होऊन त्यांना शासन होईल. फक्त मंत्र्यांच्या मुलीच नाही तर महाराष्ट्रातील सर्वसाधारण महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारची आहे. यावरून राजकारणाची पातळी किती खाली घसरली ही गोष्ट प्रकर्षाने पुढे येताना दिसत आहे. नेत्यांच्या मुलींना राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास देण्यात येत असून मी याचा तीव्र शब्दात निषेध करते. आरोपी कोण होते, कुठल्या पक्षाचे होते हे येणाऱ्या दिवसांत समोर येईल. राज्यातील महिला आणि मुलींची सुरक्षितता ही महायुती सरकारच्या प्राधान्य क्रमावर असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत आहेत," असेही त्यांनी सांगितले.