जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सायकल रॅलीचे आयोजन
मोकळ्या वातावरणात सायकल चालवणे ही एकप्रकारची ध्यानधारणा
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांचे प्रतिपादन
03-Mar-2025
Total Views |
ठाणे: ( International Womens Day ) बंदिस्त व्यायामशाळा किंवा जिममध्ये सायकल चालवणे आणि मोकळ्या वातावरणात सायकल चालवणे यात फरक आहे. मोकळ्या वातावरणात सायकल चालवणे ही एक प्रकारची ध्यानधारणाच असल्याचे प्रतिपादन प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन यांनी रविवारी रणरागिणी सायकल फेरीचे आयोजन केले होते.
यावेळी, नाशिक ते अयोध्या अशी सायकलवारी करणाऱ्या राजकिशोरी लांडगे यांना यंदाच्या रणरागिणी गौरव पुरस्काराने तर कविता म्हात्रे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी (०२ मार्च) सकाळी ६.३० वा. ठाणे महापालिका मुख्यालयापासून ६.५ किमी आणि ३.५ किमी अशा अंतराच्या दोन सायकल फेऱ्या झाल्या. या फेऱ्यांमध्ये ५ वर्षांपासून ७४ वर्षापर्यंतचे सुमारे ३५० हून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले होते.त्यानंतर,ठामपा मुख्यालयात पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
या सोहळ्यात, डॉ. शैलेश उमाटे यांनी सायकलिंग व मानसोपचार याबद्दल माहिती दिली. भारतात सुमारे आठ टक्के लोकांना मानसिक त्रास जाणवतो आहे. परंतु, हे सगळे रुग्ण उपचारासाठी येतातच असे नाही. व्यायाम म्हणून सायकल चालवल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. शरीरातील सर्व स्नायूचा व्यायाम होतो. सायकल चालवण्यास कोणत्याही वयाचे बंधन नाही. दिवसाच्या २४ तासांमधील अवघी १५ मिनिटे जरी सायकल चालवण्यासाठी दिले तरी त्याचा शरीर आणि मनावर चांगला परिणाम दिसून येतो. मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर हा उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी, सुश्मिता डे, डॉ. वैशाली दोंडे, सरोजीनी उपाध्याय, श्वेता चिलखेवार या महिलांचा, अन्वी रिठे, युक्ता मगम, स्वरा जाधव या मुलींचा त्याचप्रमाणे जमिनीवरुन पृथ्वी प्रदक्षिणा करणारे हिंदआयान राईडचे संस्थापक विष्णुदास चापके यांना सायकलप्रेमी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमास, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनच्या आरती राय, आरती देसाई, संस्थेचे सचिव दीपेश दळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.