संघ समजण्याचे माध्यम म्हणजे स्वयंसेवक होणे : रमेश पतंगे

    03-Mar-2025
Total Views |

Amhi Sanghat Ka Ahot Book Publishing Mumbai

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Amhi Sanghat Ka Ahot)
"संघ समजण्याचे माध्यम म्हणजे स्वयंसेवक होणे. पुस्तक वाचून किंवा भाषण ऐकून संघ समजणार नाही. यात १० टक्के विचार तर ९० टक्के जगणं असून संघाचे कार्य क्षितिजाच्या आकलनासारखं आहे.", असे प्रतिपादन हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे यांनी केले.

विवेक प्रकाशित, पद्मश्री रमेश पतंगे लिखित 'आम्ही संघात का आहोत...' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. २ मार्च रोजी सकाळी १० वाजता कीर्ती महाविद्यालय, काशिनाथ धुरू मार्ग, दादर पश्चिम येथे संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिद्धीविनायक भाग संघचालक डॉ. राजीव झणकर व भारत मंथन फाउंडेशनचे संचालक भूषण मर्दे उपस्थित होते.
 
यादरम्यान विवेकच्या पुस्तक विभाग व्यवस्थापक शितल खोत यांनी पद्मश्री रमेश पतंगे यांच्याशी मुलाखतीतून संवाद साधला. संघाचे मूलभूत सामाजिक विचार आणि देशभरातील सर्वस्पर्शी असणाऱ्या कामाची मांडण, तसेच संघाविषयी जाणिव पूर्वक गैरसमज पसरवणाऱ्या शक्तींना सडेतोड उत्तर या मुलाखतीच्या माध्यमातून दिले. सदर कार्यक्रम मंथन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा काय याबाबत सांगताना रमेश पतंगे म्हणाले, " सर्व आयुष्य संघात गेल्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. लेखनाची प्रेरणा या संघातूनच आली आहे. स्वयंसेवकाची आजची गरज काय? असा विचार केला असता संघशताब्दीला धरून केलेले चिंतन या पुस्तकात मांडले आहे. शिशु, बाल, तरुण, व्यवसायी, प्रौढ अशा विविध टप्प्यात स्वयंसेवकाने संघ कसा अनुभवला, याबाबत पुस्तकात वाचायला मिळेल.

या पुस्तकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची प्रस्तावना लाभली आहे. रमेश पतंगे यांनी साधारण 30 वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या 'मी मनू आणि संघ' या पुस्तकाचा हा पुढचा भाग असल्याचे सरसंघचालकांनी प्रस्तावनेत म्हटले आहे.