महिला दिनाच्या निमित्ताने सभागृहाचे विशेष सत्र! मंत्री आदिती तटकरेंची माहिती
03-Mar-2025
Total Views |
मुंबई : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येत्या ८ मार्च रोजी सभागृहाचे विशेष सत्र होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार, ३ मार्च रोजी दिली.
विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधीमंडळाचे विशेष सत्र होणार आहे. यादिवशी शनिवार असूनही सर्व महिला लोकप्रतिनिधी आणि राज्यातील महिलांसाठी हे सत्र होणार आहे."
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारीचा हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वितरीत केला जाणार आहे. येत्या ५ ते ६ तारखेपासून लाभ वितरणाची प्रक्रिया सुरु होणार असून ८ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच २१०० रुपयांच्या तरतूदीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. महिला व बालविकास विभागाकडे निधी येतो तो महिलांच्या खात्यात पोहोचवणे आणि ती यंत्रणा अधिक सक्षम करण्याकडे आम्ही आमचे लक्ष केंद्रित करत असल्याचे त्या म्हणाल्या.
महिलांचा प्रतिसाद बघून विरोधकांमध्ये नैराश्य
"विरोधक सुरुवातीपासून लाडकी बहिण योजनेवर आरोप करत आहेत. आम्ही जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत. गेल्या महिन्यामध्ये दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातसुद्धा ज्या लाभार्थी महिला आहे, त्या त्याच प्रमाणे राहतील. योजना जाहीर झाल्यापासून ही योजना विरोधकांना खुपत आहे. गेल्या ५-६ महिन्यांपासून ज्याप्रकारे महिलांचा प्रतिसाद मिळत आहे तो पाहिल्यानंतर विरोधकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. तेच नैराश्य विरोधक बहिणींमध्ये पसरवताना दिसत आहेत. परंतू, महायुतीचे सरकार सक्षम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार यापुढेही लाडकी बहीण योजना सक्षमपणे कार्यरत ठेवणार आहे," असे आश्वासनही मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.