मुंबई : औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे विधान करून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने अबू आझमी सोमवार, ३ मार्च रोजी विधानभवनात उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली. अबू आझमी म्हणाले की, "औरंजेबाच्या काळात भारतवर्षाची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. त्यावेळी भारताचा जीडीपी २४ टक्के होता. भारताला तेव्हा सोने की चिडीया म्हटले जात होते," असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, "औरंगजेब हा क्रुर राज्यकर्ता नव्हता. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धर्माची नसून ती राजकीय होती," असे ते म्हणाले. दरम्यान, अबू आझमींच्या या विधानानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.