बिजू जनता दलाच्या माजी खासदारानं केला आंतरजातीय विवाह, समाजाने घातला १२ वर्षे बहिष्कार! काय आहे प्रकरण?

15 Mar 2025 14:06:28

ex bjd mp pradeep majhi faces social ostracisation after inter-caste marriage
 
 
भुवनेश्वर : (Pradeep Majhi's Inter-caste Marriage Controversy) ओडिशातील नवरंगपूरचे माजी खासदार आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते प्रदीप माझी (Pradeep Majhi) यांना त्यांच्या आंतरजातीय विवाहामुळे त्यांच्या भातरा समाजाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला १२ वर्षांसाठी बहिष्कृत केले आहे. प्रदीप माझी यांनी बुधवार दि. १२ मार्च रोजी गोव्यामध्ये केंद्रपाडा जिल्ह्यातील सुश्री संगीता साहू या ब्राह्मण समाजातील महिलेशी लग्न केले. यानंतर अखिल भारतीय आदिवासी भात्र समाजाच्या केंद्रीय समितीने धामनागुडा येथे बैठक घेऊन प्रदीप आणि त्याच्या कुटुंबाला १२ वर्षांसाठी समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, समितीचे म्हणणे आहे की, प्रदीप यांनी आपली जात सोडून लग्न केले, जे त्यांच्या समाजातील परंपरांच्या विरोधात आहे. समाजातील कोणीही प्रदीप माझी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेणार नाही, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. याआधीही प्रदीप यांनी आपली बहीण संजू माझी हिचा विवाह कोटपुटच्या जगन्नाथ मंदिरात ब्राह्मण कुटुंबातील तरुणाशी करून दिला होता, यामुळे समाजाच्या परंपरांचे उल्लंघन झाल्याने भातरा समाजाने नापसंती दर्शवली होती.  वारंवार परंपरा मोडत असून, त्यामुळे समाजाची संस्कृती, परंपरा धोक्यात आल्याचे समाजाचे म्हणणे आहे.
 
“प्रदीपने दुसऱ्या जातीतील व्यक्तीशी लग्न करून आपल्या समाजाचा द्वेष करत असल्याचे सिद्ध केले,” असे एका समिती सदस्याचा आरोप केला आहे. सातत्याने नियमांविरुद्ध जात असल्याने समाजाने त्यांच्यावर ही कठोर कारवाई केली आहे. या निर्णयावर प्रदीप यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता या बहिष्काराच्या निर्णयावर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0