मृत्यूचे रहस्य

भाग-३१

    13-Mar-2025
Total Views |

mrutyuche rahasya part 31
 
जयद्रथ वध आणि सुदर्शन चक्र
 
प्रयत्नांची शिकस्त केल्यावरही अर्जुनाला, जयद्रथाला मारता आले नाही. अर्जुनाच्या प्रतिज्ञेनुसार, आत्मदहनाची वेळसुद्धा जवळ आली होती. भगवान श्रीकृष्णांनी युक्तीने हा प्रश्न सोडविला. त्यांनी कौरवसैन्याच्या सहस्त्रदलकमल व्यूहासमोरच, अर्जुनाला चिता रचून आत्मदहन करण्यास सांगितले. अर्जुन तयार झाला. इतक्यात एकदम सूर्यास्त होऊन काळोख पडला. भगवंतानी अर्जुनाला सांगितले की, “वीर पुरुषाने स्वतःची शस्त्रे घेऊनच अग्नीत प्रवेश करावा.” अर्जुन चितेत स्वतःला कसे भस्म करणार हे पाहण्यासाठी कर्ण, दुर्योधनादि वीर जयद्रथासस्तपुढे आले. जयद्रथाला पाहिल्याबरोबर अर्जुन क्रोधाने लाल झाला होता, पण सूर्यास्तमुळे धर्मयुद्धानुसार तो जयद्रथाला मारू शकत नव्हता आणि अर्जुनाचे धर्माआचरण सर्व कौरवांना ठावूक होते. अर्जुन विषादानेच आपली शस्त्रे घेऊन अग्निभोवती प्रदक्षिणा करीत होता.
 
तो अग्नीत स्वतःला झोकणार, इतक्यात एक चमत्कार घडला. अस्तंगत सूर्यनारायण पुनः तेजाने तळपू लागले. श्रीकृष्णाने अर्जुनाला लगेच सांगितले, “अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ!” अर्जुनाने तत्काळ आपले धनुष्य सावरून, जयद्रथाच्या नरडीवर बाण मारला. अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली. पांडव सैन्यात हर्ष, तर कौरवसैन्यात विषाद! पण हे घडले कसे? त्यामागे भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राचा पूर्वेतिहास होता. भगवंतांच्या सुदर्शनचक्राला, काही काळ काळोखात म्हणजे, अप्रकाशित राहण्याचा शाप मिळाला होता. त्या शापाचाच योग्य उपयोग भगवंतांनी आपला भक्त अर्जुन याला जीवदान देण्याकरिता केला होता. सूर्यास्तापूर्वीच श्रीकृष्णांनी सूर्यासमोर आपले चक्र आणून ठेवले व जयद्रथादि कौरव पक्षीय अर्जुनाच्या टप्प्यात आल्यावर, ते काळोखपूर्ण सुदर्शन चक्र त्यांनी बाजूला सारले आणि अर्जुनाकरवी जयद्रथाचा वध करविला कथा इतकी रोमांचकारी आहे, आता यातील योग विज्ञान पाहू. वास्तविक सूर्याचा अस्त व प्रकाशित होणे, हे मधल्या कोणत्याही वस्तूला धरून नसते.
 
पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे, सूर्योदय वा सूर्यास्त होतो. बरे सुदर्शनचक्रासारखा एखादा प्रचंड गोल जरी सूर्यासमोर आणला, तरी तो सूर्यासमोर इतका लहान असतो की, त्याच्या अस्तित्वाला एका कोपर्‍यात ठेवून सूर्य आपली विश्वव्यापक किरणे पृथ्वीवर पाठवेलच. एवढी मोठी पृथ्वी, पण तीसुद्धा ठीक सूर्याआड होण्यास तीन ग्रह एका सरळ रेषेत यावे लागतात. तरीही खरी सायंकाळची वेळ आली नसल्यास, ग्रहणकाल संपल्यावर वा अगोदर सूर्यास्ताचा आभास अगोदरपासून बघणार्‍यांना होत नसतोच. असे असता, भगवान श्रीकृष्णांच्या करकमलात असणार्‍या इवल्याशा सुदर्शनाने, सूर्यासारख्या प्रचंड ज्योतिभांडाराला आडवे येऊन भर माध्यान्यालाच सायंकाळचा आभास उत्पन्न करावा? हे बुद्धिवंतांना विचार करायला भाग पाडते. आता परमेश्वर काहीही चमत्कार करू शकतो, असे वाद घालणारे भावनाप्रधान लोक म्हणतील. परमेश्वराला जर प्रचंड चमत्कार करायचा असता, तर त्यांनी अभिमन्यूचा वध का होऊ दिला? सहस्त्रदलकमल व्यूहच वितळून, जयद्रथाला का उघडे पाडले नाही ? अनेक प्रश्नांना भावनाप्रधानांचे एकच उत्तर आहे, परमेश्वराची लीला अतर्क्य आहे! असल्या लीलेने जग चालत नसते. जग हे जडाच्या नियमांनी चालले आहे. तेव्हा वरील कथेतील गूढ योगरहस्य आपणास पाहिले पाहिजे. भगवान गीतेत तेच म्हणतात,
 
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥अ.६श्लो.५॥
 
स्वतःच स्वतःचा संसारसमुद्रातून उद्धार करून घ्यावा.अधोगतीला जाऊ नये, कारण मनुष्य स्वतःचाच मित्र व शत्रू आहे. अभिमन्यू याचा शास्त्रीय अर्थ अभिमानी, क्रोधी किंवा अभिनिवेश असणारा, हे सर्वश्रुत आहे. जीवात्मा त्याच्या शरीराचा अतिशय अभिनिवेश असणारा असा आहे, हा अर्जुनाचा पुत्र होता. अर्जुन या शब्दाचा वेदातील अर्थ, प्रेरणाशक्ती असा आहे. जीवनातील प्रेरणाशक्ती, जीवात्म्याला शरीराचा अभिनिवेश घडवते. आता हे चक्रव्यूह कोणते? या शरीरालाच महाभारतकार चक्रव्यूह म्हणतात. चक्रव्यूहाला सात द्वारे होती, तर मानवी देहातसुद्धा सात योगचक्रे असतात. म्हणून भगवान पातंजलीही देहाला चक्रव्यूह असेच म्हणतात.
 
॥नाभिचक्रे काय व्यूह ज्ञानम्॥
 
नालहळचक्रावर संयम केल्यास, संपूर्ण शरीराचे ज्ञान होते. जीवात्मा शरीरात चक्रगतीनेच प्रवेश करतो, हा श्रेष्ठ योग्यांचा अनुभव आहे. अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरणेच माहीत होते, त्यातून सही-सलामत बाहेर पडणे त्याला माहीत नव्हते. आपल्यापैकी सर्वांनाच या कायव्यूहात जन्माच्यावेळी शिरणे माहीत आहे, पण त्यातून ज्ञानासह सही-सलामत बाहेर पडणे माहीत नाही. साधारण माणसे शरीररूप चक्रव्यूहातून, मृत्यूरुपानेच बाहेर पडतात. शवासन सिद्ध करणारा अर्जुनरुप एखादा योगीच, जिवंतपणे आपल्या जडशरीरातून बाहेर पडू शकतो. उद्योगशील पराक्रमी साधकालाच वेद ‘अर्जुन’ म्हणतात. वेदांतील एक ऋचा पाहा व त्याचा अर्थ पाहा -
 
वयश्चित्ते पतत्रिणे द्विपच्चचुष्पद् अर्जुनी।
उषः प्रारन्नु तूरनु दिवो अन्तेह्यस्परि॥
(ऋग्वेद, उषा स्तोत्र)
 
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ चालवीत असत. अर्जुन कोण, त्याचा रथ म्हणजे काय व त्या रथाचा चालक कोण याबद्दल उपनिषदे स्पष्ट सांगतात,
 
आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु।
बुद्धिं तु सारथिविद्धि मनः प्रग्रहमेवच।
 
म्हणजे आत्मा हा रथिनं (अर्जुन), शरीर हेच रथ असून, त्या रथाची चालक उच्च बुद्धी (श्रीकृष्ण) असून, लगाम म्हणजे मन आहे. सदसद्विवेक बुद्धी म्हणजेच परमेश्वरच होय. तेव्हा चक्रव्यूह म्हणजे, आपले शरीर व जीवात्मा म्हणजे, त्या शरीराचा अभिनिवेशी अभिमन्यू होय. शरीरात चक्रव्यूहाला दाखविल्याप्रमाणे, सात योगचक्रे असतात. प्रथम चक्राला ‘मूलाधार’, तर शेवटच्या चक्राला ‘सहस्त्रदलकमल’ असे म्हणतात. याच सहस्त्रदलकमलात, जयद्रथ लपून बसला होता. अविद्या वा आपल्या साधनेचा अहंकार म्हणजे, जयत् रथ (जयद्रथ) होय. सहस्त्रदलकमलात रमणारे महान योगीसुद्धा अहंकाराच्या अविद्येत दंग राहतात, असा या कथेचा अर्थ आहे. खरा अर्जुन साधक, तेथूनसुद्धा आपल्यातील अहंकार अविद्येला बाहेर काढून ठार मारतो, हा या जयद्रथ कथेचा योगार्थ आहे. या अर्थाने, अर्जुन, अभिमन्यू, श्रीकृष्ण आणि जयद्रथ आपल्या देहातच आहेत. साधनेतील वृत्तीयुद्ध म्हणजेच महाभारत होय. तुकाराम महाराज वर्णन करतात ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग!’ कोणते युद्ध हे सुज्ञांनी जाणावे...
 
(क्रमशः)
 
योगिराज हरकरे
 

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
 
९७०२९३७३५७