मीपणाचा अर्थात अहंभावाचा त्याग करून रामाचा, स्वस्वरुपाचा शोध घेत असताना ते स्वरूप, ते तत्त्व आपल्याच ठिकाणी असल्याचे आढळते असे स्वामींनी मागील श्लोक क्रमांक १८६ मध्ये सांगितले. परमात्म तत्त्वाविषयी बोलताना स्वामी म्हणाले, ‘सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहे।’ अगदी जवळ असणार्या आपल्याच रुपाला आपण दुरावलो, याचे कारण आपला अहंभाव. मीपणाने आपण अंतरंगातील शाश्वत सत्याचा शोध घेऊ शकत नाही, त्या सत्याचा अनुभव घेऊ शकत नाही. स्वामींनी मनाला तेच तत्त्व शोधायला सांगितले आहे. तथापि, त्यात मनाला अनेक अडचणी येतात. कारण, मनाला सभोवतालचे भौतिक जग पाहण्याची सवय दृढ झालेली असते. त्यापलीकडे जाऊन अनुभव घेणे, मनाला थोडे कठीणच जाते. यातून बाहेर पडण्यासाठी, समर्थ पुढील श्लोकात मनाला उपदेश करीत आहेत.
भुतें पिंड ब्रह्मांड हें ऐक्य आहे।
परी सर्व ही सस्वरूपीं न साहे।
मना भासले सर्व काहीं पहावें।
परी संग सोडूनि सूखी रहावे ॥१८७॥
आपल्या दृष्टीला दिसणारे, भासणारे भौतिक जगत हे अनेक घटकांनी बनलेले आहे. या सर्व घटकांचे वर्गीकरण पंचमहाभूतात करता येते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाचात, सर्व वस्तूंचे घटक समाविष्ट करता येतात. समर्थ यांचा उल्लेख ‘भुते’ या शब्दाने करतात. भुते म्हणजे पंचमहाभुते. आपल्याला सृष्टीत जाणवणारा आणखी भेद म्हणजे सचेतन आणि अचेतन. परंतु, या दोन्ही ठिकाणी, पंचमहाभुतेच असल्याचा प्रत्यय येतो. सभोवार दिसणारा विश्वाचा हा अफाट पसारा पाहिला, तरी तेथे पंचमहाभुते प्रत्ययास येतात. म्हणून स्वामींनी म्हटले आहे की, भुते, पिंड, ब्रम्हाण्ड हे सारे एकमेकांत मिसळून गेले आहेत. असे असले तरी स्वस्वरूपाचा, परब्रह्माचा विचार करता, त्या चैतन्यमय अवस्थेत दृश्य जगतातील पंचमहाभुतांना कोठेही स्थान आढळत नाही. चैतन्य परब्रह्म, अंतरात्मा यांचा विचार करताना, शाश्वत म्हणजे कायम टिकणारे काय आहे आणि अशाश्वत म्हणजे, कालांतराने नाश पावणारे काय आहे, हे ठरवावे लागते.
शाश्वत-अशाश्वत या विषयावर, स्वामींनी मागे चर्चा केली आहे. स्वामींच्या मते, या विश्वात दिसणार्या सर्व भौतिक वस्तू विघटनक्षम आहेत. अर्थात, त्यातील घटकांचे विघटन संभवनीय असल्याने, भौतिक वस्तू अशाश्वत ठरतात. आज जरी या वस्तू दिसत असल्या, तरी विघटनक्षम गुणधर्मामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. आज ना उद्या दृश्य वस्तुतील घटक विलग होऊन जातील, अथवा त्या घटकांचे रुपांतरण (ढीरपीषेीारींळेप) होऊन, नवीन दृश्य वस्तू आकाराला येईल. त्यामुळे भौतिक वस्तू भासमय ठरते. संतांना भौतिक जगत, भासमान असल्याचे जाणवते. संत त्यालाच अशाश्वत म्हणतात; ते मुळात नाहीच असे मानतात. तथापि, परब्रह्म, अंतरातील परमात्मा, रामरूप हे शाश्वत म्हणजे कायम टिकणारे आहेत, अविघटनशील आहेत. अध्यात्माच्या परिभाषेत याला शाश्वत परब्रह्म म्हणतात. ते काल होते, आज आहे आणि भविष्यातही अनंत काळापर्यंत तसेच राहणार आहे. मनाने त्याचा शोध घेतला, तर मानवी जीवन सुखी होईल, असे स्वामी म्हणतात.
येथून पुढे मनाची खरी अडचण दिसून येते. परमात्मतत्त्व शाश्वत तर खरे, पण आपल्याला त्याची अनुभूती नसते. याउलट भौतिक जगत अशाश्वत हे मान्य करूनही तेच खरे आहे, अशी मनाची धारणा झालेली असते. आपला सततचा वावर अशाश्वत भौतिक जगतात असतो. ते खरे मानून जीवन जगायचे असते. अशा वेळी मनाने काय करायला हवे, हे सांगताना समर्थ उपदेश करतात की, आपल्या मनाला भासते, ते विश्व आपण पाहावे. पण त्यात रममाण न होता, भौतिकाची संगती मनाने सोडावी व शाश्वताच्या, रामाच्या संगतीत मनाने राहून सुखी व्हावे. थोडक्यात, बाह्य जगाचा परित्याग करून, त्यापासून वेगळे होऊन राहण्याऐवजी भौतिक जगातच राहून, व्यवहारात राहून मनाने त्याचा त्याग करावा. दृश्य जगाची संगत प्रत्यक्षात सोडायची नसून, मनाने त्यात गुंतायचे नाही. अशाश्वत जगाचा त्याग करून राहणे, सामान्य माणसाला जमणार नाही. तेव्हा समर्थ या ठिकाणी, व्यवहारात वागण्याची एक युक्ती आपल्यासाठी सांगत आहेत आणि ती मोलाची आहे. या जगातील सर्वसामान्य माणसे जशी व्यवहारात वागतात, तसे आपण वागावे. परंतु, अंतरात मात्र शाश्वतता-अशाश्वतता यांचा विवेक बाळगून असावे. त्यामुळे मन व्यवहार नीट सांभाळेल, पण त्याचे आकर्षण, लोभ त्याला उरणार नाही. मन शाश्वत रामाच्या ठिकाणी राहून, आपण जीवनात सुखी होऊ. समर्थांनी हा विषय दासबोधात सविस्तरपणे मांडला आहे. त्यातील पुढील ओवी हा विचार स्पष्ट करते.
प्रकृती सारीखें चालवें।
परी अंतरीं शाश्वत वोंळखावें।
सत्य होऊन वर्तावें।
लोकांऐसे॥ (दा. ११.२.४०)
व्यवहारात लोकांसारखे आचरण ठेवून, अंतरंगात विवेकाने नेमके शाश्वत काय आहे याची सदैव जाणीव ठेवल्यास, माणसाला सुखी होता येते. तरीही मनाने काही गोष्टींचा संग कसा सोडावा? हे समर्थ पुढील श्लोकात स्पष्ट करीत आहेत.
देहेभान हें ज्ञानशस्त्रे खुडावे।
विदेहीपणें भक्तिमार्गे चि जावें।
विरक्तीबळें निंद्य सर्वे तजावें।
परी संग सोडूनि सुखें रहावें॥१८८॥
परमार्थ मार्गक्रमणातील महत्त्वाची अडचण म्हणजे, ’मी देह आहे’ असा पक्का समज झाल्याने उत्पन्न होणारे देहभान. आपले सर्व व्यवहार या देहाद्वारे करावे लागत असल्याने, देहाला महत्त्व प्राप्त होते. तीच आपली ओळख मानली जाते. त्यातून, मी म्हणजेच देह ही कल्पना दृढ होते. ही देहभावना सोडायची तर, चिरंतन आत्मा हेच माझे खरे स्वरूप असून मी तो आहे, या ज्ञानाचा उदय झाला पाहिजे. समर्थ सांगतात की, या ज्ञानरूपी शस्त्राने देहभान तोडून टाकल्याशिवाय ते जमणार नाही. ही शस्त्रक्रिया अवघड असली, तरी आवश्यक आहे. मी अविनाशी आत्मा आहे, अशी खर्या अर्थाने जाणीव झाल्यावर देहभान नाहीसे होते. देहभान मावळल्यावर, मी आत्मा असल्याची जाणीव स्पष्ट होऊ लागते व देहहंकारापासून मुक्त होऊन, विदेही स्थिती अनुभवता येते. तेथे भक्ताने ब्रह्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहावे. या अनुसंधानातूनच भक्तिमार्ग साधता येतो. समर्थांचा भक्तिमार्ग ज्ञानाधिष्ठित असल्याने, मी व परब्रह्म वेगळे उरत नाहीत. ‘विभक्त नव्हे तो भक्त’ अशी भक्ताची व्याख्या समर्थ करतात. तरीही मनाला विरक्तीचा अभ्यास करावा लागतो. समर्थांच्या मते, विरक्ती म्हणजे सर्वसंगपरित्याग करून राहणे नव्हे, तर जे निंद्य आहे, ते सर्व टाकून देण्यासाठी विरक्तीचा अभ्यास करावा लागतो. सर्व निंद्य गोष्टींचा संग सोडला, तर माणूस सुखाने जीवन जगू शकतो, असे स्वामींना विरक्तीबळाचे महत्त्व पटवून देऊन सांगायचे आहे. मनाच्या श्लोकांच्या सुरुवातीसच समर्थ म्हणाले आहेत की, “जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे। (श्लोक क्रमांक २) त्यानेच सर्व समाज, प्राणीमात्र सुखी होतील. हे माणसाला विरक्तीबळाच्या जोरावर जमणारे आहे. (क्रमशः)
७७३८७७८३२२