लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?
13-Mar-2025
Total Views |
मुंबई : होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते. कोकण आणि गोमंतक प्रांतात होळीच्या सणाला शिमगा किंवा शिग्मो असे सुद्धा म्हटले जाते. परंतु महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विविध प्रांतांमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी खेळली जाते.
१. लाठीमारी उत्सव, वृंदावन
वृंदावनमध्ये आगळी वेगळी अशी लठमार होळी खेळली जाते. श्रीकृष्ण राधेला भेटण्यासाठी बरसाना येथे जात असत, यामध्ये राधेच्या सोबत असलेल्या गोपिका लाठी घेऊन श्रीकृष्णाच्या मागे लागायाच्या. म्हणूनच दरवर्षी नंदगाव इथले पुरूष बरसाना इथे येतात आणि लाठीमारीचा हा उत्सव साजरा होतो.
२. फुलांची होळी, वृंदावन
एकादशीच्या दिवशी वृंदावनात फुलांची होळी खेळली जाते. एकमेकांवर फुलांचा वर्षाव करत लोक या सणाचा आनंद लूटतात.
३. विधवांची होळी, उत्तर प्रदेश
समाजात आलेल्या काही चुकीच्या रूढींमुळे विधवा स्त्रीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळं ठेवलं जाते. परंतु काळाच्या ओघात या चुकीच्या प्रथा मागे पडत, समाजाच्या मुख्य धारेतील उत्सवांमध्ये आता विधवा स्त्रीया देखील सामील होत आहेत. या स्त्रीयांचं आयुष्य रंगांनी भरलेलं असावं म्हणून गोपीनाथ मंदिराचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले केले जातात.
४. होल्ला मोहल्ला, पंजाब
पंजाबमध्ये होळीच्या सणाला एक ज्वलंत रंग चढलेला असतो. पंजाबमध्ये होल्ला मोहल्ला हा उत्सव साजरा केला जातो. होल्ला म्हणजेच हल्ला. शीखांमधला निहंग सांप्रदाय आपल्या युद्ध परंपरेसाठी ओळखला जातो. निळ्या आणि भगव्या रंगाच्या पोशाखात आपलं हेच युद्धकौशल्य यावेळी सादर करण्यात येतं. शारिरीक श्रमाबरोबरच किर्तनांचं ओयोजन सुद्धा केलं जातं. शीखांचा दैदिप्यमन इतिहास हा बलिदानाच्या असंख्य कहाण्यांनी भरलेला आहे. यावेळेला कवितांच्या आणि संगीताच्या माध्यमातून याच वारश्याचा जागर केला जातो.
संस्कृती आणि परंपरेच्या विविधतेने आपली भूमी समृद्ध झाली. संस्कृतीमधली विविधता हाच आपल्या जीवनाचा अमूल्य असा वारसा आहे. काळाच्या ओघात प्रथा परंपरा बदलल्या. एखाद्या वाहत्या नदीसारखं वेगवेगळे प्रवाह आपली संस्कृती स्विकारत गेली आणि समृद्ध झाली. या सणांमागचा मूळ उद्देश म्हणजे माणसांना एकत्र आणणे. जीवनातील काही क्षणांसाठी आपली दुखं, चिंता विसरून साऱ्यांनी एकत्र येवं, एकमेकांशी संवाद साधावा हा यामागचा विचार. माणसाचं शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहावं, पर्यावरणाचं रक्षण व्हावं अश्या व्यापक भूमिकेतून होळीचा हा सण आपण साजरा करतो.