छावा कादंबरी इंग्रजी वाचकांच्या भेटीला!

"या" लेखिकेने पेलले शिवधनुष्य!

    13-Mar-2025
Total Views |

Chhava

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची गाथा सांगणारा छावा हा चित्रपट नुकतंच काही दिवसांपूर्वी प्रदर्शीत झाला. विकी कौशल याच्या दमदार अभिनयाने नटलेल्या छावा या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलं. छावा हा सिनेमा विख्यात कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारित आहे. १९७९ साली पहिल्यांदाच छावा कादंबरी प्रकाशित झाली. अल्पावधीतच ही कादंबरी लोकप्रिय ठरली आणि आजतागयात या कादंबरीच्या २४ आवृत्तया प्रकाशित झाल्या आहेत. छावाच्या या यशानंतर देशातील कानाकोपऱ्यातून आणि अगदी जगभरातील वाचकांकडून या कादंबरीची मागणी केली जाऊ लागली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची गाथा सांगणारी छावा कादंबरीचा इंग्रजी अनुवाद नुकतंच प्रकाशित झाला. छावा कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत यांची कन्या कादंबिनी धारप यांनी या अनुवादाचे शिवधनुष्य पेलत, संभाजी राजांचा जीवनपट जगासमोर मांडला आहे. ‘छावा’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर या साहित्यकृतीच्या भाषांतरासाठी मागणी वाढली होती. प्रथमच इंग्रजी प्रकाशनांकडूनही एखाद्या मराठी कादंबरीसाठी इतकी उत्सुकता पाहायला मिळत होती. त्यामुळे वाचकांच्या मागणीला प्रतिसाद देत मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘छावा’ कादंबरीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले आहे. शिवाजी सावंत यांच्या कन्या कादंबिनी धारप यांनी यापूर्वी युगंधर या मराठी कादंबरीचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला होता. छावा चित्रपटच्या निमित्ताने शिवाजी सावंत यांच्या कादंबरीच्या हिंदी अनुवादाची सुद्धा विशेष आवृत्ती प्रकाशित केली.