धर्माभिमानी समाजसेवी सावजी

    13-Mar-2025   
Total Views |

article on social worker savji beej
 
 
धर्मांतरणविरोधी चळवळ ते गावासाठी एक निस्वार्थी समाजसेवक म्हणून काम करणार्‍या, डहाणूच्या सावजी बीज यांच्याविषयी...
 
पालघर जिल्ह्यात आजही काही जनजाती पाड्यांमध्ये, ख्रिश्चन मिशनरी सक्रिय आहेत. भोळ्याभाबड्या जनजाती बांधवांना आपल्या जाळ्यात अडकवून, विविध आमिषे दाखवून, त्यांना धर्मांतरित केले जाते. अशीच काहीशी परिस्थिती होती, ती डहाणूच्या गांगणगावची. गावातील लोक मूळ धर्म सोडून धर्मांतरित होत आहेत, हे कुठे तरी थांबायला हवे याकरता पुढाकार घेतला, तो गावातले रहिवासी सावजी बीज यांनी. तेव्हापासूनच त्यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या धर्मांतरणविरोधी चळवळीचा श्रीगणेशा झाला .
 
दि. १७ एप्रिल १९८६ रोजी गांगणगावात, सावजी बीज यांचा जन्म झाला. आपल्या बालवयात त्यांनी, शारीरिक कष्ट करून शिक्षण पूर्ण केले. सेवा विद्यामंदिर आदिवासी हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले, तर केएल पोंडा महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्या काळात विरारला एके ठिकाणी, सावजी बालमजूर म्हणून काम करायचे. दिवसा महाविद्यालय, तर संध्याकाळी काम असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. असे करत करत करत, त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
 
शिक्षकांचा लाडका विद्यार्थी हाच वर्गाचा प्रतिनिधी, अशी काहीशी मान्यता आजही असल्याचे आपण पाहतो. सावजीसुद्धा त्यांच्या शाळेत शिक्षकांचे लाडके विद्यार्थीच होते. मग तेव्हा वर्गातील मुलांना, कसलीही दुखापत झाल्यास त्यांना दवाखान्यात घेऊन जाणे, शिक्षकांची काही कामे करणे अशा गोष्टी करण्यात, त्यांना आनंद वाटायचा. पुढे इयत्ता सातवीत गेल्यावर, त्यांची ‘स्कूल लिडर’ म्हणून निवड करण्यात आली. हळूहळू मग गावात त्यांचे समाजकार्य सुरू झाले. त्यातून त्यांची गावात येणार्‍या सरकारी अधिकार्‍यांशी, ओळख होत गेली.
 
मधल्या काळात सावजी एका मिशनरीच्या शाळेत, संगणकविषय शिकवायला होते. सगळे अगदी गुण्यागोविंदाने सुरू होते. एक दिवस असा आला की, त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता, कामावरून काढून टाकण्यात आले. का, तर मिशनरी शाळेच्या अंतर्गत गोष्टी ते बाहेर सांगतील म्हणून. त्यानंतर सावजी यांची एक मैत्रीण, त्यांच्या मदतीला धावून आली. मुंबईहून तिने काही संगणक आणून दिले आणि सावजींनी, आपल्या गावातील व परिसरातील मुलांसाठी संगणकाचे वर्ग सुरू केले. दुपारचा वेळ मग संगणक शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राखीव असायचा.
 
त्यांचे काही विद्यार्थी तहसीलला कामाला होते, तर काही डहाणूच्या औष्णिक विद्युत केंद्रात. पुढे तीच मंडळी, साहेब लोक म्हणून उच्च पदावर आली. त्यामुळे गावासाठी कुठलेही कार्य करायचे म्हटले, की ते अगदी सहजतेने व्हायचे. त्यासाठी लागणारी परवानगी मग चटकन मिळायची. त्यातूनच मग गावकर्‍यांना हळूहळू कळायला लागले की, सावजींनी एखादे काम करायचे मनावर घेतले, की ते पूर्ण करतातच. साधारण सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, संध्याकाळच्या वेळेला गावातील ३०-४० लोक सावजींना भेटायला आली. कसलीतरी अडचण आहे, हे त्यांच्या चेहर्‍यावरच दिसत होते. गांगणगावात असलेले विजेचे लाकडी खांब काढून टाकायचे आणि त्या ठिकाणी नवीन खांब आणायचे, अशी गावकर्‍यांची इच्छा होती. सावजींनी गावकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते तयारीला लागले. सर्वप्रथम गावातल्या लोकांना संघटित केले. मंत्रालयाच्या पायर्‍या झिजवल्या, नेतेमंडळींच्या भेटी-गाठी घेतल्या. हे सर्व झाल्यानंतर, तीन वर्षांनी अखेर गावकर्‍यांच्या मागणीला यश आले आणि गावात नवे विजेचे खांब आले.
 
मधल्या काळात, आपण ‘पिंट्याचा डब्बा आणि येशू’ असे समीकरण जोडणारा एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला. व्हिडिओ गमतीशीर वाटत असला, तरी ख्रिश्चन मिशनर्‍यांचे धर्मांतरणाचे षड्यंत्र किती घातक आहे, हे ओळखण्याची वेळ आली आहे. सावजींनी हे धर्मांतरणाचे षड्यंत्र ओळखले आणि जनजातींना संघटित करून, त्यांच्यामार्फत जनजागृती करण्याचा निश्चय केला. सावजींच्या पुढाकारातून, जनजाती पाड्यांत उभारलेली धर्मांतरणविरोधी चळवळ ही देखील कौतुकास्पद आहे. चळवळ यासाठी, की गावकर्‍यांनी ख्रिश्चन मिशनर्‍यांकडून होणार्‍या अवैध धर्मांतराच्या कृत्याला मोडून काढायचेच ठरवले होते. कारण गावात कोणी आजारी असले, की मिशनर्‍यांनी त्यांना लक्ष्य केलेच म्हणून समजा. त्यामुळे सावजींनी प्रत्येक गावात, हिंदू धर्माप्रति जनजागृती करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून गावकर्‍यांनीसुद्धा आता ही मोहीम आपल्या हाती घेतली असून, सावजींच्या बरोबरीने ते मिशनर्‍यांना पळवून लावण्यास पुढे सरसावले आहेत.
 
जनजातींची संघटित शक्ती हिंदुत्वाचा जागर करू लागल्याने, अनेक जनजाती पाड्यांतील चित्र बदलल्याचे दिसत आहे. सावजींचे एक कार्य लक्षणीय ठरते ते म्हणजे, त्यांनी सुरू केलेला साप्ताहिक सत्संग. भजन, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी, गावकर्‍यांमध्ये धर्माचे महत्त्व आणि धर्माप्रति विश्वास निर्माण केला. पुढे ‘सेवा भारती’शी संपर्कात आल्यानंतर, आज समाजकार्य अविरतपणे सुरू आहे. अतिशय संघर्षमय जीवन जगत पुढे आलेले सावजी बीज, आज त्यांच्या गावासाठी आणि जनजातींना धर्मांतरित होण्यापासून रोखण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक