संजय राऊत यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्याने...; मंत्री संजय शिरसाट यांची घणाघाती टीका
13-Mar-2025
Total Views |
छत्रपती संभाजीनगर : संजय राऊत यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्याने राज्यावरील कर्जाबद्दल त्यांना माहिती नाही, असा पलटवार मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. गुरुवार, १३ मार्च रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "संजय राऊत यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्याने कोणते कर्ज कोणत्या साली घेतले याची माहिती नाही. ९ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज केव्हापासूनचे आहे हे त्यांनी तपासून पाहायला हवे. आरोप करताना कोणत्या काळात किती कर्ज काढले याची आकडेवारी त्यांनी आमच्याकडून घ्यावी. परंतू, बेछूट आरोप करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव झाला असून आम्ही त्यांची दखल घेत नाही," असे ते म्हणाले.
विरोधकांची दुटप्पी भूमिका!
"लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध आहे हे विरोधकांनी स्पष्ट करावे. एकीकडे योजना चालू ठेवण्यासाठी ते आग्रही आहेत तर दुसरीकडे, कर्ज काढल्यामुळे सरकार कर्जात बुडाले असल्याचे ते सांगतात. ते वारंवार दुटप्पी भूमिका घेत आहेत. त्यामुळे सरकारने लाडकी बहिण योजना बंद करावी, हे महाविकास आघाडीच्या लोकांनी स्पष्टपणे सांगावे. त्यानंतर काय परिणाम होतात ते बघावे. लाडकी बहिण योजना कायमस्वरूपी सुरु राहिल. ती बंद होणार नाही. सरकारवर कर्जाचा डोंगर थोडा वाढत असला तरी त्यावर उपाययोजना शोधत कर्जाचा बोजा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे," असेही ते म्हणाले.
जंयत पाटील दादांकडे येणार!
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांबद्दल बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, "लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप येईल आणि जयंत पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादीत दिसतील," असा दावा त्यांनी केला आहे.