झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना मंदिरांचे संरक्षण करावे! मंत्री मंगल प्रभात लोढांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
13-Mar-2025
Total Views |
मुंबई :(मंगल प्रभात लोढा) मुंबईतील जुन्या चाळी आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना तेथील मंदिरांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गुरुवार, १३ मार्च रोजी त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.
मुंबई शहरात १८०० पेक्षा जास्त जुन्या इमारती आणि मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या अस्तित्वात आहेत. त्यांचा पुनर्विकास करत असताना त्या परिसरातील मंदिरे हटवल्यानंतर रहिवाशांच्या भावना दुखावून त्यांच्यात असंतोष निर्माण होतो. या रहिवाशांच्या भावना मंदिरांशी जुळलेल्या असतात. त्यामुळे १०० वर्षांपूर्वीच्या सर्व मंदिरांना त्यांच्या स्वयंभू जागीच संरक्षित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच पुनर्विकास झाल्यानंतर रहिवाशी संघाच्या संमतीने नवीन ठिकाणी मंदिरांच्या बांधकामासाठी किमान ३०० चौरस फूट किंवा अस्तित्वातील मंदिर २०० चौरस फूटांपेक्षा जास्त जागेत असल्यास त्या मंदिराच्या जागेच्या दीडपट जागा देणे विकासकाला बंधनकारक असेल. तसेच पुढील पाच वर्षांसाठीचा मंदिराची देखभाल आणि पुजाअर्चेचा खर्चदेखील पुनर्विकास आराखड्यात समाविष्ट असावा. यासंदर्भात बृहन्मुंबई महापालिकेला योग्य निर्देश देण्यात यावे," अशी मागणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांना केली आहे.