सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक!

    12-Mar-2025
Total Views |

khokya bhosale arrested from prayagraj
 
 
बीड : (Khokya Bhosale Arrested) बीडमधील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. खोक्या अर्थात सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या भोसले फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. आता बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला अटक केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
 
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत काय म्हणाले?
 
खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या अटकेप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, ” गुन्हा दाखल झाल्यापासून खोक्या फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. प्रयागराजला त्याचे शेवटचे लोकेशन सापडले. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रयागराज पोलिसांशी समन्वय साधून त्याला तिथून अटक करण्यात आली. आमची टीम तिथे पोहोचली असून त्याला इथे आणण्यात येणार आहे. दुसऱ्या राज्यात अटक केल्याने ट्रान्झिट रिमांड घ्यावी लागते. त्याकरिता परवानगी घ्यावी लागते. लोकल कोर्टाची परवानगी घेऊन त्याला इथे आणण्यात येणार आहे.”
 
सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
 
“खोक्या भोसलेला अटक केली ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने जी चूक केलीय, त्यासंदर्भात त्याला अटक झाली. कायद्याप्रमाणे त्यावर कारवाई होईल”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.