वजन कमी व्हावे, आपण बारीक दिसावे यासाठी केरळच्या कन्नूरमधील कुथुपरंबा येथील श्रीनंदा ही १८ वर्षांची तरुणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने विशेष डाएट प्लॅन अवलंबत होती. तिच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, वजन वाढू नये यासाठी डाएट प्लॅननुसार ती जेवायचीदेखील नाही आणि खूप व्यायाम करायची. जेवण सोडल्यामुळे ती पुरती अशक्त झाली होती. त्यासाठी तिला थालास्सेरी येथील रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा नुकताच मृत्यू झाला. वजन कमी करण्याच्या नादात आणखीन एक तरुणी अशीच हकनाक मेली.
‘सांग दर्पणा कशी मी दिसते?’ प्रत्येक मुली-महिलांच्याच मनातला प्रश्न. जगाने सौंदर्याची जी चौकट आखून दिली, त्या चौकटीतच शरीराची ठेवण, त्वचेचा रंग, नाकडोळे बांधा वगैरे वगैरे असावेत, यासाठी आटापिटा करणार्या मुली-महिलांची संख्या कमी नाही. रंग गोरा व्हावा, शरीर अगदी सडपातळ व्हावे, चेहरा आखीवरेखीव दिसावा, यासाठी भरमसाठ प्रयत्न केले जातात. अर्थात, प्रयत्नाने सुंदर दिसणे, यात गैर काहीच नाही. पण, जेव्हा अतिशयोक्ती होते, तेव्हा त्याचे परिणामही भयंकरच असतात. श्रीनंदाचा मृत्यू याचेच उदाहरण आहे. श्रीनंदाने डोळे झाकून तो डाएट प्लॅन अवलंबला. डाएटचा तो प्लॅन आपल्यासाठी योग्य आहे का? याचा विचारही तिने केला नव्हता. तिच्या पालकांनीही तिला याबाबत अडवले नाही का? सौंदर्याची चौकट समाजमनात ठाम आहे. त्यापलीकडे काही असले, तर समाजाकडून त्याला प्रथमदर्शनी सहज स्वीकृती असते का? सत्य उत्तर आहे, नाही! हेच दडपण श्रीनंदावर होते का? काय झाले वजन जास्त असले तर? काय झाले काळा रंग असेल तर? काय झाले उंची कमी असेल तर? तेही निसर्गाची देणच. पण, हे सगळे समाजाच्या स्त्री-सौंदर्य कक्षेत बसत नाही. तसेच, लग्न आणि इतरही अनेक स्तरावर या चौकटींचाच विचार केला जातो. त्यामुळे श्रीनंदाचा मृत्यू नैसर्गिक होता, आत्महत्या होती की, समाजाच्या धारणांनी तिचा घेतलेला बळी होता? शारीरिक सौंदर्य मूल्यवान आहेच. पण, शारीरिक सौंदर्यापेक्षा आत्म्याचे, बुद्धीचे, वर्तणुकीचे सौंदर्य अमूल्य आहे. शारीरिक सौंदर्याच्या चौकटीच्या व्याख्येत जग अडकले आहे, हेच खरे. ही चौकट मोडायला हवी!
फरक तर असणारच!
"तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही,” असे उद्धव ठाकरे नुकतेच देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले. खरंच आहे ते म्हणा. कारण, उद्धव यांच्याकडे ‘जागतिक आरोग्य संघटने’चे लोकही चक्क सल्ला मागायला येतात. उद्धव ‘ब्येस्ट शीएम’ आहेत, असे सांगणारे संजय राऊत आहेत तरी का देवाभाऊंकडे? आपलीच मुलाखत आपल्याच गोटात छापून आपणच खूश व्हायचे, हे अनोखे कसब तरी आहे का देवेंद्र फडणवीस यांच्याकडे? अडीच वर्षे तर सोडा, चार दिवस काहीही काम न करता, मुख्यमंत्रिपदाला चिकटून राहायचा चिवटपणा देवेंद्र यांच्याकडे आहे का? नाहीच मुळी. त्यामुळे देवेंद्र फडणवीस कधीही उद्धव ठाकरे होऊच शकत नाहीत.
महाराष्ट्रात तर सोडाच, अवघ्या भूमंडळी उद्धव ठाकरेंसारखे कुणी होऊच कसे शकेल? कर्तृत्वाचा ऐतिहासिक वारसा होताच. मात्र, तोच वारसा मातीमोल ढासळवण्याचे सुमार काम देवेंद्र करू शकतील का? तर नाहीच. त्यामुळे उबाठा म्हणजे उद्धव ठाकरे जे बोलले ते अगदी १०० टक्के सत्य. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणे, केवळ विशिष्ट व्यक्तीच्या, घराण्याच्या पोटी जन्माला आले म्हणून ‘साहेब’ म्हणून मनमर्जी तसे वागणे, हे नशीब देवेंद्र यांचे आहे का? तर नाहीच. त्यामुळे उद्धव अगदी खरे बोलत आहेत. हे सगळे खरे बोलताना त्यांची काही विधाने मात्र संशोधन करण्यासारखी आहेत. जसे ते म्हणाले, “कोरोना काळात त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेतली. इतर कुणाहीपेक्षा महाराष्ट्रात जास्त काम केले गेले.” हे खरे आहे का लोकहो? कोरोना काळात महाराष्ट्रात अभूतपूर्व अनागोंदी होती, हे कुणीही सांगेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विनामूल्य रेशन योजना’ राबविली म्हणून त्यावेळी कोटी कुटुंबांच्या मुखी दोन घास अन्न जाऊ लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सोबतीने हजारो स्वयंसेवी संस्था आणि समाजशील व्यक्ती रस्त्यावर उतरल्या. दुसरीकडे उद्धव त्याच काळात मुख्यमंत्री असताना म्हणे, खिचडी आणि कोरोना मृतांना ठेवण्यासाठीच्या बॅगमध्येही भ्रष्टाचार झाला होता, असे पुढे आरोप झाले. त्यामुळे फडणवीसांचा आणि उबाठांचा कार्यकाळ यांची तुलना केली, तर कुणीही म्हणेल, छे छे देवेंद्र उबाठा होऊच शकत नाहीत. ते कुठे राऊतांचे ‘ब्येस्ट शीएम’ आणि देवेंद्र कुठे जनतेच्या मनातले निवडून आलेले सीएम. फरक तर असणारच!