विधान भवनासमोरचा पदपथ ‘इफ्तार’मुक्त'!

    12-Mar-2025
Total Views |
 
Nitesh Rane
 
मुंबई : नरिमन पॉईंट परिसरातील विधानभवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, तेथील पदपथाचा वापर 'रोजा' सोडण्यासाठी केला जात असल्याची धक्कादायक बाब दै. 'मुंबई तरुण भारत'ने बुधवार, दि. १२ फेब्रुवारीच्या अंकातून उजेडात आणली. त्याची दखल घेत मंत्री नितेश राणे यांनी पोलीस उपायुक्तांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.
 
विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या डॉ. उषा मेहता चौकात येस बँकेच्या बाजूला असलेला पादचारी मार्ग रमजान चालू झाल्यापासून नियमित सायंकाळी रोजा सोडण्यासाठी अडवला जात आहे. नियमित सायंकाळी ६ वाजण्याच्या वेळेत या पादचारी मार्गावरच फळाहार ठेवून तेथे बैठका अंथरुन तेथे रोजा सोडण्याचा कार्यक्रम केला जातो. यामुळे १ तासाहून अधिक काळ हा पादचारी मार्ग पूर्णपणे बंद रहात आहे. त्यामुळे पादचारी आणि तेथील छोटे-मोठे व्यावसायिक यांना अडचण येत असल्याची बाब दै. 'मुंबई तरुण भारत'ने उजेडात आणली होती.
 
हे वाचलंत का? -  रोजा सोडण्यासाठी विधानभवनासमोरील पदपथाचा वापर
 
या बातमीचे पडसाद बुधवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. विधिमंडळ सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर, याबाबत सरकारने निवेदन करावे, असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले.
 
यापुढे दिसणार नाहीत - नितेश राणे
 
ही बाब अतिशय गंभीर असून, मी त्याबाबत परिमंडळ-१च्या पोलीस उपायुक्तांशी बोललो आहे. एकाला परवानगी दिली, तर उद्या दुसरे कोणीतरी येऊन बसतील. त्यामुळे हा पदपथ तात्काळ मुक्त करावा, असे निर्देश मी त्यांना दिले आहेत. यापुढे तेथे रोजा सोडण्यासारखे प्रकार दिसणार नाहीत, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.