मुंबई : वर्षानुवर्षे हलालच्या नावाने हलाल जिहाद केला जातो आणि हलालच विकत घ्या असा आग्रह धरला जातो, असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सोमवार, दि. १० मार्च रोजी 'मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम' (https://malharcertification.com) या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. हिंदू रितीनुसार झटका पद्धतीने मांसविक्री करणाऱ्या दुकानांना याद्वारे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मात्र, यावरुन विरोधकांकडून प्रचंड टीका करण्यात येत आहे.
यावर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "हिंदुत्ववादी विचाराचे तरुण काही चांगला प्रयत्न करत असतील आणि त्यामुळे हिंदू समाजाला चांगल्या दर्जाचे मटण मिळत असेल तर त्यांच्या प्रयत्नांना मी पाठिंबा दिला आहे. ज्यावेळी हलालच विकत घ्या असा दबाव टाकला जातो त्यावेळी कुणीही प्रश्न विचारत नाही. पण हिंदू धर्माच्या माध्यमातून असे प्रयत्न होत असल्यास दोन धर्मात तेढ निर्माण होण्याचा प्रश्न कसा येतो? वर्षानुवर्षे हलालच्या नावाने हलाल जिहाद केला जातो आणि हलालच विकत घ्या असा आग्रह धरला जातो, तेव्हा कुणीही प्रश्न विचारण्याची हिंमत करत नाही. हे हिंदू राष्ट्र आहे. इथे ९० टक्के हिंदू लोक राहतात. इस्लाममध्ये हलालच खाण्याची परवानगी आहे. पण आमच्या धर्मात असे काहीच नाही. हिंदू धर्मात हलाल मटण खाण्याबाबत कुठेही लिहिलेले नाही," असे ते म्हणाले.
कुणाला हिरव्या मिरच्या लागता कामा नये!
"कुणी काय खावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण हिंदू धर्माच्या तरुणाने पुढाकार घेऊन चळवळ सुरु केली असेल आणि त्यांच्या हाताला काम मिळत असल्यास कुणाला हिरव्या मिरच्या लागता कामा नये. झटका मटणच्या माध्यमातून हिंदूत्ववादी विचाराचे कार्यकर्ते हिंदू समाजासाठी स्वच्छ मटणाचा पर्याय घेऊन आले आहेत. त्यांना पाठींबा देण्याचे काम मी करत आहे. ज्यांना हिंदूद्वेष आहे तेच याविरोधात आवाज उठवत आहेत," असेही ते म्हणाले.