महाराष्ट्रातील कुस्तीगीरांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे महत्वाचे पाऊल

12 Mar 2025 18:45:00
 
anaskar
 
मुंबई : महाराष्ट्रातील कुस्तीगीर ही महाराष्ट्राची शान आहेत, त्या खेळाला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन द्यायचे असेल तर त्या कुस्तीगीरांना योग्य ठिकाणी योग्य त्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आपल्या नोकऱ्यांमध्ये ५ टक्के जागा या कुस्तीगीरांसाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वेळा महाराष्ट्र केसरी बहुमान प्राप्त झालेले आणि सध्या राज्य शासनाच्या लाचलुचपत विभागात आयुक्त म्हणून कार्यरत असलेले श्री. विजय चौधरी यांनी राज्य सहकारी बँकेकडे विनंती केली होती. त्याला मान देऊन हा निर्णय बँकेने घेतला असे सांगण्यात आले आहे.
 
या निवडीसाठी सदर व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे तसेच राज्य सहकारी बँकेने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कब्बडी या खेळाला प्रोत्साहन म्हणून राज्य कब्बडी असोसिएशनच्या कार्यक्रमांस ९५ लाखांचे प्रायोजकत्व दिले आहे तसेच या खेळाला उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
 
अशा प्रकारे महाराष्ट्रातील मैदानी खेळांना प्रोत्साहन देऊन त्यांचे संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राची पारंपारिकता टिकवून ठेवणे हेच आमचे धोरण आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0