ठाणे : होळी (Holi Festival) म्हटली की धुळवड आलीच.मात्र, रासायनिक रंगांचा बेरंग टाळुन नैसर्गिक रंगानी होळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाने दरवर्षीप्रमाणे नैसर्गिक रंगांची कार्यशाळा आयोजित करून निसर्गातील रंगांचा प्रचार व प्रसार करून जनजागृती सुरू केली आहे.
महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात 'होळी उत्सव' साजरा केला जातो. दिवसेंदिवस होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेवून नागरिकांनी वृक्षतोड टाळावी तसेच धुलीवंदनाच्या दिवशी मोठया प्रमाणावर रंगाचा वापर करण्यात येतो. तर धुळवडीत रंगाची निवड करताना सतर्क राहायला हवे. चुकीच्या रंगामुळे शरिराला अपाय होऊ शकतो. ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाने याविषयी कार्यशाळा घेऊन घरगुती नैसर्गिक रंगाचा वापर करून होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. विविध प्रकारच्या भाज्या तसेच फुलांपासून कोरडे तसेच ओले रंग बनवताना सुगंधासाठी यात तुम्ही चंदनाचे तेलही मिसळू शकता. अशा प्रकारे नैसर्गिक रंग तयार होतात.धुळवडीत नैसर्गिक रंग वापरल्याने पर्यावरण रक्षणासोबतच शारीरीक इजा होणार नसल्याचे नमुद करून नैसर्गिक रंग कसे बनवायचे त्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
नैसर्गिक रंगामुळे पर्यावरण जतन
होळी - धुळवडीसाठी बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त रंगामुळे शरीरावर अपाय होतातच किंबहुना पर्यावरणाचीही हानी होते. शिवाय हवेचे तसेच मातीचेही प्रदुषण होते. परिणामी मानवी आरोग्याचे रक्षण होते. तेव्हा, घरच्या घरी नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्यशाळेतुन दिले जाते. फळे, फुले, भाजीपाला तसेच निसर्गातील अनेक गोष्टींपासून रंग सहज उपलब्ध करता येतात. हे कार्यशाळेत प्रत्यक्ष दर्शवण्यात येते.याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रत्येकाने याची जनजागृती किमान पाच जणांना करावी.
- पौर्णिमा शिरगावकर, पर्यावरण दक्षता मंडळ
नैसर्गिक रंग कसा मिळतो?
लाल रंग – डाळींब, बीट, लाल चंदन, गुलाब, जास्वंद
गुलाबी रंग - लाल रंगात गव्हाचे पीठ वापरावे
पिवळा रंग – झेंडू, बहावा, शेवंती तसेच हळद मुलतानी मातीमध्ये मिसळावी.
हिरवा रंग - जास्वंदीचे पान, पालक, पुदिना, कडुलिंब
निळा रंग – गुलमोहर तसेच हेबिकस फुले सुकवुन
केशरी रंग – पळस, शेंद्रीच्या बियांपासुन केशरी रंग
जांभळा रंग – लॅव्हेंडर फुल.