दुबई आणि सिडनीच्या धर्तीवर मरोळमध्ये मासळी बाजार उभारणार - मंत्री नितेश राणे

12 Mar 2025 18:50:46

 Nitesh Rane on fish market in Marol  
 
मुंबई: ( Nitesh Rane on fish market in Marol ) दुबई आणि सिडनीच्या धर्तीवर मरोळ (अंधेरी पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार आणि कोळी भवन उभारण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी दिले.
 
मुंबई महानगरपालिकेंतर्गत मरोळ येथे मच्छिमार बांधवासाठी कोळी भवन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार उभारणी, तसेच मच्छिमार समस्यांची आढावा बैठक मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आली. या वेळी मुंबई पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन., आयुक्त किशोर तावडे, फिशरी महामंडळाच्या महाव्यवस्थापक अंकिता मेश्राम आणि बेसिल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
मंत्री नितेश राणे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय मासळी बाजारामुळे मच्छीमारांना अधिक सुविधा मिळतील तसेच मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल. मरोळ परिसरातील कोळी बांधवांचा पारंपरिक व्यवसाय अधिक आधुनिक आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धेसाठी सक्षम होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
मासळी बाजार आणि कोळी भवन तयार करतांना जागतिक दर्जाचे करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यात याव्यात,असेही मंत्री श्री. राणे यांनी नमूद केले. बेसील कंपनीच्या प्रतिनिधींना सादरीकरणाद्वारे करण्यात येणाऱ्या मासळी बाजार व कोळी भवनाच्या इमारतीची माहिती दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0