लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांचा सभागृहात गदारोळ! मंत्री आदिती तटकरेंनी थेट आकडेवारीच जाहीर केली
12-Mar-2025
Total Views |
मुंबई : लाडकी बहिण योजनेतून अनेक लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात थेट आकडेवारी जारी करत सडेतोड उत्तर दिले.
बुधवार, १२ मार्च रोजी विधानसभेत आमदार रोहित पवार आणि वरुण सरदेसाई यांनी लाडकी बहिण योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला. ज्या महिला शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजना मिळते त्यांचे नाव लाडकी बहिण योजनेतून वगळणार आहात का? या अधिवेशनात १५०० रुपयांचे २१०० रुपये करणार आहात का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला त्यावेळी त्यात नमूद करण्यात आले होते की, जर काही महिलाशासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा १५०० हून अधिक रकमेचा लाभ घेत असल्यास ती महिला लाडकी बहिण योजनेस पात्र होणार नाही. नमो शेतकरी योजनेत महिलांना १००० रुपयांचा लाभ मिळतो. अशा जवळपास साडे पाच ते सहा लाख लाभार्थी असून त्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात आलेले नाही. तर शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार, त्यांना नमो शेतकरी योजनेतून १ हजार रुपये मिळतात, तर वरचे ५०० रुपये लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून मिळतात. तसेच २० ते २५ लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचा आकडा अफवांमधून आलेला आहे. शासनाकडून असा कुठलाही आकडा देण्यात आला नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर निवडणुकीपूर्वी योजना जाहीर केली त्यावेळी लाडकी बहिण योजनेचे किती लाभार्थी होते? निवडणुकीनंतर सगळे निकष लावल्यानंतर नेमक्या किती लाभार्थी महिलांना अपात्र करण्यात आले? आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे महिलांना २१०० रुपये देणार की, नाही? असे तीन प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केले.
दरम्यान, यावर उत्तर देताना आदिती तटकरे यांनी थेट आकडेवारीच जाहीर केली. "ऑक्टोबर २०२४ मध्ये आचारसंहितेच्या आधी २ कोटी ३३ लाख ६४ हजार महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी होत्या. त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात लाभ वितरित केलेल्या महिलांची संख्या २ कोटी ४७ लाख आहेत. याचा अर्थ आचासंहितेच्या आधी २ कोटी ३३ लाख ६४ हजार होता तर आता २ कोटी ४७ लक्ष महिलांना लाभ दिला आहे," असे त्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही!
"महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली असून महिलांना १५०० रुपयांचा लाभ वितरित करणारे महायुतीचे एकमेव सरकार आहे. त्यामुळे महिलांच्या आयुष्यातील हा आनंद असाच राहणार आहे. आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य वेळी २१०० रुपयांसंदर्भात निर्णय घेतील. परंतू, लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, याची दक्षता महायूती सरकार घेईल," असा विश्वासही आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.