अभिनेत्री सौंदर्याचा अपघात कि हत्या? ज्येष्ठ अभिनेते मोहन बाबूंविरोधात तक्रार दाखल!

    12-Mar-2025
Total Views |
 
 
 
21 years after sooryavansham actress soundarya death complaint filed against mohan babu
 
 
 
 
मुंबई : भारतीय दूरदर्शनवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिकेत असलेला सूर्यवंशम हा चित्रपट. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या साऊथ इंडियन अभिनेत्री सौंदर्या या प्रामुख्याने तेलुगू चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. याशिवाय, त्या कन्नड, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही झळकल्या होत्या.
 
 
दुर्दैवाने, सूर्यवंशम प्रदर्शित झाल्यानंतर पाच वर्षांनी, १७ एप्रिल २००४ रोजी, सौंदर्याचा एका खासगी विमान अपघातात मृत्यू झाला. त्या भाजप आणि तेलुगू देशम पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी करीमनगरला जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात तिचा भाऊ अमरनाथ याचाही मृत्यू झाला. आणखी दु:खद बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी सौंदर्या गरोदर होती, तसेच तिच्या कुटुंबीयांना तिचे शवही मिळू शकले नाही. या हृदयद्रावक घटनेला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तेलुगू सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन बाबू यांच्याविरोधात सौंदर्याच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप करणारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्युज १८ कन्नडा च्या वृत्तानुसार, चिट्टीमल्लू नावाच्या व्यक्तीने खम्मम एसीपी आणि खम्मम जिल्हाधिकाऱ्यांकडे मोहन बाबूंविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यात या विमान अपघाताचा संबंध केवळ अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
 
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, सौंदर्या आणि तिचा भाऊ अमरनाथ यांचा मोहन बाबूंशी जमिनीच्या वादावरून वाद सुरू होता. शमशाबादमधील जलपल्ली गावातील सहा एकर जमीन विकण्यास या भावंडांनी नकार दिला होता, त्यामुळे मोहन बाबूंनी हा कट रचल्याचा आरोप आहे. या तक्रारीनुसार, सौंदर्या आणि तिच्या भावाच्या मृत्यूनंतर मोहन बाबूंनी ती जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली. तक्रारदाराने सरकारकडे विनंती केली आहे की, या वादग्रस्त जमिनीवर सरकारने ताबा मिळवून ती अनाथाश्रम, सैन्य कुटुंबे, पोलीस दल किंवा पत्रकारांसाठी वापरावी. तक्रारीत मोहन बाबू आणि त्यांचा मुलगा मांचू मनोज यांच्यातील वादाचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, तक्रारदाराने मोहन बाबूंपासून स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.