मनसेचे बदलते ‘फेजेस’

    11-Mar-2025   
Total Views |

raj Thackeray questions about the cleanliness of river ganga at mahakumbh
 
 
मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना आपल्या काखा खाजवाव्या लागल्या नसत्या. गंगेच्या पाण्यातच असे गुण असतात, जे स्वतःच पाणी स्वच्छ करतात. गंगेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या ‘बॅक्टेरियोफेज’ गंगेचे प्रदूषण होण्यापासून बचाव करतात. हे संशोधन ‘स्वच्छ गंगा मिशन’अंतर्गत, ‘एनआयआरआय’चे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा खैरनार यांच्या नेतृत्वात करण्यात आले. गंगाजलामध्ये ऑक्सिजनचा स्तर २० मिलीग्रॅम प्रति लीटरपर्यंत आढळून आला असून, त्याचबरोबरच ‘टेरपिन’ नावाचे एक ‘फायटोकेमिकल’ आढळून आले. हे तीन तत्त्वच गंगेचे पाणी शुद्ध ठेवतात.
 
त्याचप्रमाणे अत्यंत प्रदुषित वातावरणातही गंगेचे पाणी उच्च प्रमाणात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण टिकवून ठेवू शकते. याचा शोध सर्वप्रथम, ब्रिटिश जीवाणुतज्ज्ञ अर्नेस्ट हँकिन यांनी १८९६ साली लावला. त्यांच्या संशोधनातून सिद्ध झाले की, सामान्य नळाच्या पाण्यात सहज विकसित होणारे कॉलरा रोगाचे जीवाणू, गंगाजलाच्या संपर्कात आल्यावर अतिशय जलद गतीने नष्ट होतात. गंगाजलाच्या उकळून आणि गाळून केलेल्या निरीक्षणात आढळले की, गाळलेल्या पाण्यात जीवाणूनाशक गुणधर्म कायम होते, तर उकळलेल्या पाण्यात ते नष्ट झाले. यावरून स्पष्ट झाले की, गंगाजलातील हा जीवाणूनाशक घटक उष्णतेमुळे नष्ट होतो. १९१६ साली कॅनेडियन सूक्ष्मजैवशास्त्रज्ञ फेलिक्स डी हेरले यांनी पॅरिसमधील इन्स्टिट्यूट पास्तूर येथे संशोधन करत असताना, ‘फेजेस’ या सूक्ष्मजीवांची संरचना शोधून स्पष्ट केली. विशेष म्हणजे, त्यांचाही उष्णतेमुळे नष्ट होण्याचा गुणधर्म आहे, जो हँकिन यांच्या शोधांशी पूर्णपणे जुळणारा आहे. गंगाजलाची ही स्वतःला शुद्ध ठेवण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता राज यांनी माहीत करून घेऊन, त्यावर स्वतंत्र ‘ब्लू प्रिंट’ करायला हरकत नाही.
 
 
 
भोपळ्याचे उत्तर भाषणात
 
 
 
महाराष्ट्राची ‘ब्लू प्रिंट’ समोर ठेवून, राज यांनी पक्षाची बांधणी केली. आधी विकासाचा, पुरोगामित्वाचा नंतर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन, मनसेचे राजकारण पुढे सरकत गेले. पहिल्या झटक्यात १३ आमदार निवडून आले खरे; पण संसदीय आयुधांचा योग्य वापर न करता, आक्रमक झाल्याने अनेकांचे निलंबन झाले. भावना भले योग्य होती, मात्र आमदारांची पद्धत चुकली आणि निलंबनाची कारवाई झेलावी लागली. त्यानंतर मनसेला कधीही दोन आकडी संख्या गाठता आली नाही. राज यांचे इंजिन रुळावर आल्याचे वाटत असतानाच, ते पुन्हा घसरू लागते. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे उद्धव ठाकरे असो वा राज ठाकरे किंवा मग आदित्य ठाकरे, कुणीही महाकुंभाला गेले नाही. संपूर्ण महाकुंभ काळात, ६५ कोटींहून अधिक लोकांनी गंगा स्नान केले. त्यांना ते पाणी घाण वाटले नाही कारण, त्यांची श्रद्धा अतूट होती. विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणे वाईट नाही. मात्र, त्याआडून आपल्या परंपरा, संस्कृती आणि हिंदू धर्मावर टीकास्त्र कशासाठी? गंगेचे पाणी अशुद्ध आहे, असे म्हणणे हे हिंदू धर्मावर टीका न करताही, मांडता आले असते. परंतु, दोन्ही हात वर करून, काखा खाजवण्याची नक्कल करून नेमके टाळ्या मिळवण्यापलीकडे राज यांनी काय साध्य केले असावे? असा प्रश्न पडतो.
 
नाशिक मनपात २०१७ साली १२ नगरसेवक, तर २०१२ साली मनसेच्या ‘ब्लू प्रिंट’वर विश्वास ठेवून, ४० नगरसेवक निवडून आले. २०१७ साली ती संख्या पाचवर आली. एकेकाळी मनसेचा महापौर असलेल्या नाशिकमध्येही कुंभमेळा भरतो. तेव्हा गोदावरी स्वच्छ होती का? तेव्हा राज यांना असे विधान का सुचले नाही? तेव्हा नाशिककरांनी मनसेवर विश्वास ठेवला, त्यामुळे गोदावरीत स्नान करणार्‍यांवर राज टीका करणार का? ज्या सिंहस्थ भरणार्‍या शहराने राज यांना सत्ता दिली, त्यांचाही यानिमित्ताने राज यांनी अपमान केला. ‘ठाकरी भाषेत समाचार घेतला,’ या गोंडस वाक्याखाली हिंदूंचा आणखी किती अपमान होणार, हा प्रश्न आहे. भगव्या रंगाची भडक शाल पांघरून, हेच राज ठाकरे एकेकाळी हिंदुत्वाची कास धरून होते. मात्र, महाकुंभावरील त्यांची टीका म्हणजे, दगडातही देव पाहणार्‍या श्रद्धाळू माणसांचा मोठा अवमान आहे. राज यांना विधानसभेत भोपळा का मिळाला? याचे उत्तर त्यांच्या भाषणांमध्येच दडलेले आहे.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.