योगाने निश्चयदृढता...

लेखांक - ३१

    11-Mar-2025
Total Views |

dharana is the sixth limb of ashtanga yoga
 
 
 
धारणा
 
धारणा हे अष्टांग योगातील सहावे अंग आहे. धारणा म्हणजे एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. ‘धारणा’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. ‘धारा’चा अर्थ दृढता, स्थिरता, निश्चितता असा होतो. धारण करणे, वाहून नेणे, परिधान करणे, आधार देणे, राखणे, टिकवून ठेवणे, (स्मरणात) चांगली आठवण ठेवणे अशी क्रिया आणि मनाचे संयोजन किंवा एकाग्रता (श्वास नियंत्रण) असादेखील होतो. एकूणच ‘धारणा’ हा शब्द मनाशी संबंधित आहे.
 
आपल्या धारणा आणि अनुभवांमुळे आपल्या श्रद्धा मजबूत होतात. ज्या आपण गृहीत धरतो, त्या गोष्टी सत्य आहेत, त्या आपण वस्तुस्थिती मानतो. प्रत्याहाराद्वारे बाह्य इंद्रियांवरील अवलंबित्व काढून टाकल्यानंतर, मनाला बाहेरील वर्तमानाच्या विचारांची काळजी नसते. परंतु, मन अजूनही भूतकाळातील किंवा भविष्यातील अंतर्गत विचारांमध्ये गुंतलेले असते. हे विचार काढून टाकणे आणि लक्ष एका केंद्रबिंदूकडे आणणे व वर्तमानात राहणे, हे धारणेचे उद्दिष्ट आहे.
 
धारणेची तयारी कशी करावी? मनाला स्थिर करण्यासाठी आणि एकाग्र करण्यासाठी इंद्रियांच्या विषयापासून दूर राहायला शिकले पाहिजे. म्हणूनच प्रत्याहार हा एक महत्त्वाचा तयारीचा टप्पा आहे. आकलन कमी केल्याने मन स्थिर होते. मनाला एकाग्रतेत आणण्याची आणि एका बिंदूवर एकाग्रता ठेवण्याची क्षमता म्हणजे धारणा. धारणेच्या सरावामध्ये मनाला एखाद्या विशिष्ट वस्तूवर स्थिर करणे अंतर्भूत असते. धारणेच्या सरावासाठी प्रतीक, देवता, प्रतिमा किंवा अगदी सूर्य किंवा ज्योतीसारख्या बाह्य वस्तूवर एकाग्रता होऊ शकते.
 
आध्यात्मिक धारणा
 
धारणा मार्गामध्ये चेतनेच्या आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या उच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी एकाग्रता आणि मानसिक एकाग्रतेची पुष्टी करणे होय. धारणा म्हणजे ध्यानापूर्वीचा सराव आहे. धारणेमुळे आपण स्पष्टपणे विचार करायला, शिस्तबद्ध राहण्यास आणि आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यास शिकतो. मन खंबीर होण्यास मदत होते आणि सहज विचलित होत नाही. निश्चय दृढ होतो. थोडक्यात, धारणा म्हणजे धारण करणे? काय धारण करायचे, तर सत्य विचार. म्हणजे कोणता विचार? म्हणजे हे ऐहिक, दृश्य विश्व नश्वर आहे आणि आत्मिक विश्व तेवढे शाश्वत आहे, अमर आहे.
 
उदाहरणार्थ:
 
वासांसि जीर्णानि यथा विहाय।
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय
जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही॥
(भगवद्गीता अध्याय २ श्लोक-२२)
 
अर्थ - ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसर्‍या नव्या शरीरात जातो.
 
व्यावहारिक दृष्टीने जसे आपण बघतो, अनुभवतो की, सर्व दृश्य, वस्तू या बदलत असतात; नष्ट होत असतात. मग या सृष्टीत स्थिर काय आहे? तर फक्त बदल हाच स्थिर आहे. म्हणजे सर्व नश्वर आहे, अगदी आपले शरीरसुद्धा! आपण अनुभवतो ना, कालपर्यंत जी व्यक्ती होती, ज्याच्यासोबत गप्पा केल्या होत्या, पण आज ती व्यक्ती हयात नाही. किती क्षणैक व क्षणभंगुर आहे! पण, आत्मा अमर आहे, शाश्वत आहे, हा विचार पक्का करणे धरून ठेवणे ही आध्यात्मिक धारणेची एक बाजू झाली. दुसरी बाजू म्हणजे, स्वतःला प्रश्न विचारावा ’मी कोण?’ त्याचे खरे उत्तर ही धारणेची दुसरी बाजू, जी दाखवता येत नाही. जाणिवेने अनुभवता येते.
 
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥
भगवद्गीता अध्याय २ श्लोक-२३
 
अर्थ : या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.
अशी आध्यात्मिक धारणा दृढ झाली की, ती वैराग्यनिर्मितीसाठी, अनासक्त बनण्यासाठी तसेच आपली वर्तणूक सुधारण्यासाठी मदत करते.
 
धारणा हे मोठे विचार करण्याच्या आणि स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. स्वतः स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे.
 
 
 
 
 
डॉ. गजानन जोग

 
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
 
९७३००१४६६५