सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु असून, सर्व विद्यार्थी अभ्यासात गर्क आहेत. आता परीक्षा म्हटले की, चिंता, तणाव हे ओघाने आलेच. पण, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही परीक्षेच्या काळातील तणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास, ‘परीक्षेचा काळ सुखाचा’ असे म्हणता येईल. त्यासाठी नेमके काय करावे, याबाबत मार्गदर्शन करणारा हा लेख...
सध्या राज्यात परीक्षेचे वातावरण सर्वत्र दिसून येते. परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनाचा एक महत्त्वाचा आणि न टाळता येण्याजोगा भाग. परंतु, परीक्षेच्या तणावामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली येतात. काही जण अगदी घाबरलेले असतात. परीक्षेत नेमके आपले काय होईल, आपण उत्तीर्ण होऊ की नाही, याची चिंता त्यांना सतावत असते. परीक्षेची चिंता ही स्वाभाविकच, परंतु ती नियंत्रित न केल्यास विद्यार्थ्यांच्या तयारीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. परंतु, सुयोग्य नियोजन, तणाव व्यवस्थापन तंत्र आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या साहाय्याने परीक्षेची चिंता कमी करून विद्यार्थ्यांना नक्कीच यशस्वी कामगिरी करणे शक्य आहे.
परीक्षा ही केवळ गुण मिळवण्याचे साधन नसून, विद्यार्थ्यांच्या ज्ञान, समज आणि विश्लेषणात्मक कौशल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी घेतली जाते. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आपली तयारी कितपत प्रभावी आहे, हे समजते. तसेच, परीक्षेच्या अनुभवातून ते आत्मविश्वास वाढवू शकतात आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम होतात. परीक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेते. यामुळे शिकलेल्या संकल्पना, विषय त्यांनी किती आत्मसात केले आहेत आणि त्यांना ते व्यवहारात कितपत लागू करता येतात, हे स्पष्ट होते. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते. अभ्यासाची तयारी योग्य झाली आहे का, कोणत्या गोष्टींवर अधिक लक्ष द्यायला हवे, हे त्यांना समजू शकते. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारची शिस्त आणि जबाबदारीदेखील निर्माण होते. वेळेचे नियोजन, अभ्यासाची सातत्यपूर्ण सवय आणि नियोजित अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना घेता येते. याशिवाय, आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक युगात स्वतःची गुणवत्ता वाढवण्यासाठी परीक्षेची भूमिका महत्त्वाची ठरते. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास विकसित होतो, ज्यामुळे ते अधिकाधिक मेहनत घेतात आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.
शेवटी, परीक्षा विद्यार्थ्यांना उत्तम भविष्यासाठी तयारी करण्यास मदत करते. शैक्षणिक परीक्षा असो किंवा जीवनातील इतर कसोटीच्या परिस्थिती, परीक्षेचा अनुभव व्यक्तीला आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी करून देतो. त्यामुळे परीक्षेकडे तणावाने पाहण्यापेक्षा ती एक संधी म्हणून पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. परीक्षा विद्यार्थ्यांची ज्ञानाची चाचणी घेते. परीक्षा म्हणजे फक्त चांगले गुण मिळवणे नव्हे, तर उत्कृष्टतेची सवय विकसित करणेही असते.
परीक्षा देणे म्हणजे खेळ खेळण्यासारखे आहे. तुम्हाला नियम व्यवस्थित माहीत असले पाहिजे; तुम्ही तयार असले पाहिजे आणि तुमचे सर्वोत्तम प्रयत्न तुम्ही त्यावेळी केले पाहिजे.
असे म्हणतात की, परीक्षा ही फक्त तुमच्या ज्ञानाची परीक्षा नाही, तर ती तुमच्या चारित्र्याची देखील परीक्षा आहे. स्टीव्ह जॉब्स म्हणतात, “उत्कृष्ट काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर प्रेम करणे. जर तुम्हाला ते अजून सापडले नसेल, तर शोधत राहा. समाधान मानू नका. तुम्हाला ते सापडल्यावर कळेल.”
परीक्षेतील चिंतेची कारणे आणि परिणाम
- अपूर्ण तयारी : योग्य नियोजन न केल्यास आत्मविश्वास कमी होतो आणि भीती वाढते.
- उच्च अपेक्षा : पालक, शिक्षक किंवा स्वतःच्या अपेक्षांमुळे तणाव वाढतो.
- वेळेचे दडपण : परीक्षा जवळ आल्यावर नेमका आपला अभ्यास अपुरा वाटू शकतो.
- चुकीच्या अभ्यासपद्धती : रट्टा मारणे किंवा शेवटच्या क्षणी अभ्यास करणे परीक्षेपूर्वी भीती वाढवते.
- तुलना आणि स्पर्धा : इतर विद्यार्थ्यांशी सतत तुलना केल्याने आत्मविश्वास डळमळीत होतो.
परीक्षेच्या चिंतेचे परिणाम
- लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते.
- आत्मविश्वास खालावतो.
- झोपेच्या समस्या निर्माण होतात.
- अभ्यासाची गती मंदावते किंवा विसरभोळेपणा वाढतो.
- परीक्षेदरम्यान मानसिकदृष्ट्या कोलमडण्याची शक्यता वाढते.
- सूचत नाही माहित आणि असून आठवत नाही
- योग्य अभ्यास नियोजन करा
- पूर्वनियोजन : परीक्षेच्या काही आठवडे आधीच अभ्यासाचा आराखडा तयार करा.
- लक्ष्य ठरवा : प्रत्येक विषयासाठी निश्चित वेळ निश्चित करा.
- प्राधान्यक्रम द्या : अवघड विषय आधी शिकण्यावर भर द्या.
- विश्रांतीसह अभ्यास : तासन्तास अभ्यास न करता, दर ४५-५० मिनिटांनी थोडी विश्रांती घ्या.
परीक्षा ही जीवनाचा एक भाग आहे, ती टाळता येत नाही. मात्र, योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि तणाव व्यवस्थापन यांचा वापर केल्यास परीक्षेची चिंता दूर करता येते आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाता येते. परीक्षेच्या काळात मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य अभ्यास पद्धती, संतुलित जीवनशैली आणि सकारात्मक मानसिकता यांच्या साहाय्याने परीक्षेत उत्तम कामगिरी करणे शक्य आहे.