नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार : गणेश नाईक

    11-Mar-2025
Total Views |

Navi Mumbai will be of international standard city Ganesh Naik
 
नवी मुंबई: ( Navi Mumbai will be of international standard city Ganesh Naik ) राज्याचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राची विकासाची गती वाढविणारा आहे. अर्थसंकल्पात ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग आणि नवी मुंबई व खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र निर्माण करण्याच्या घोषणेमुळे नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली.
 
राज्याच्या अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधांवर भर, शेती क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या तरतुदीमुळे राज्याचा विकासाची गती आणखी वेगाने वाढणार आहे. महामुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ग्रोथ हब’ करण्याच्या घोषणेचा फायदा नवी मुंबई व खारघरला होणार आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि त्याच्या जवळील प्रस्तावित तिसर्‍या विमानतळामुळे व समृद्धी महामार्गाला जोडले जाणार असल्यामुळे पालघर परिसराचा विकास गतीने होणार आहे. पायाभूत सुविधांवर भर दिल्यामुळे राज्यात बंदरे, विमानतळांच्या विकासासाठीही मोठी गुंतवणूक येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास वन मंत्री नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
 
‘लाडकी बहिण योजना’, ‘लखपती दीदी’ योजनामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. शेती, शिक्षण, सिंचन, महिला, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, मनुष्यबळ विकास, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या सर्वच क्षेत्रासाठी भरीव तरतुदीमुळे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व सामाजिक न्यायाचे तत्त्व पाळणारा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक
 
मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. याशिवाय सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे स्कायवॉकची उभारणी आणि नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन ही ७५ कोटी रुपये किंमतीची कामे प्रगतीत आहेत. मुनावळे (ता. जावळी, जि. सातारा) येथील जलपर्यटन प्रकल्पाचा पहिला टप्पा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. हेळवाक (जि. सातारा) येथे कोयना जलपर्यटन प्रकल्पास मान्यता देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
 
महाराष्ट्र आता थांबणार नाही : आ. संजय केळकर
 
महायुती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला वेग देणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नसल्याची प्रतिक्रिया आ. संजय केळकर यांनी दिली आहे. यंदाचा अर्थसंकल्प विकासाला गती देणारा असून यातूनच विकसित महाराष्ट्र घडणार आहे. अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणासाठी विशेष योजनांचे प्रावधान केलेले आहे. क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य देण्यात आले आहे. येत्या पाच वर्षांत विजेचे दरही कमी होणार आहेत. ठाण्यातील रस्ते, उन्नत मार्ग, कोस्टल रोड, अंतर्गत मेट्रो, भुयारी रस्ते आदींच्या माध्यमातून ठाणे शहर दळणवळणाच्या दृष्टीने सक्षम होणार असल्याचे सांगून आ. संजय केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
 
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ध्येयवादी पाऊल : आ. निरंजन डावखरे
 
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेले एक ध्येयवादी पाऊल आहे. ४० लाख कोटींचे उद्दिष्ट असलेले नवे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर होणार असून, नव्या कामगार नियमांसह ५० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे राज्य म्हणून ओळख प्राप्त करून देण्याचा सरकारचा संकल्प आहे. महिला सक्षमीकरण, उद्योग विकास, रोजगार निर्मिती, पर्यटन, क्रीडा, आर्थिक गुंतवणूक या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय तरतुदी करण्यात आल्या आहेत.